'साहेब मी हत्या केली आहे,' हातात चाकू घेऊन अल्पवयीन मुलगा पोलीस ठाण्यात दाखल, म्हणाला 'काही वेळापूर्वी...'

हातात चाकू घेऊन एक मुलगा पोलीस ठाण्यात दाखल झाला असता पोलिसांना धक्का बसला. यावेळी त्याने अधिकाऱ्याला साहेब मी काही वेळापूर्वी एक हत्या केली आहे असं सांगितलं. त्याने पोलिसांना हत्या नेमकी कुठे केली आहे याचीही माहिती दिली.   

शिवराज यादव | Updated: Oct 27, 2023, 06:34 PM IST
'साहेब मी हत्या केली आहे,' हातात चाकू घेऊन अल्पवयीन मुलगा पोलीस ठाण्यात दाखल, म्हणाला 'काही वेळापूर्वी...' title=

दिल्लीतील नबी करीम पोलीस ठाण्यात जेव्हा एक अल्पवयीन मुलगा हातात चाकू घेऊन दाखल झाला तेव्हा पोलीस आश्चर्याने पाहू लागले. मुलाच्या हातातील चाकू रक्ताने माखलेला होता. अर्ध्या रात्री पोलीस ठाण्याच्या दरवाजात मुलाला पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. यावेळी त्याने पोलीस अधिकाऱ्याला काही वेळापूर्वी मी हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर त्याने पोलिसांना हत्या केलेल्या ठिकाणाचीही माहिती दिली. 

नबी करीम पोलीस ठाण्याजवळ गस्त घालणाऱ्या पोलिसांना रात्री दीड वाजता मुल्तानी ढांडा गल्लीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह आढळला होता. तपासानंतर मृतदेहाची ओळख पटली. अमित नावाची ही व्यक्ती उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे वास्तव्यास होती. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होते. तपासात पोलिसांना माहिती मिळाली की, पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचलेल्या अल्पवयीन मुलानेच अमितची हत्या केली होती. 

हत्येनंतर अल्पवयीन चाकू घेऊन पोलीस ठाण्यात दाखल

पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून रक्ताने माखलेले कपडे आणि चाकू जप्त करुन फॉरेन्सिकसाठी पाठवले आहेत. तपासात हेदेखील समोर आलं आहे की, या हत्येमध्ये आकाश उर्फ काकू नावाचा आणखी एक तरुण सहभागी होता, जो घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अमितची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. 

इतकंच नाही तर अमितची काही दिवसांपूर्वी हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपातून सुटका झाली होती. तपासात अमित आणि अल्पवयीन आरोपीचं वैर होतं असं समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वी अमितने आरोपीकडून जबरदस्ती पैसे घेतले होते. तसंच त्याचा अपमानही केली होता. यानंतर आरोपी बदला घेण्याच्या प्रयत्नात होता. 

हत्येच्या दिवशी आरोपीने अमित दिसताच त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आहे.