'माझ्या मित्राने शार्पनर चोरलंय', शाळकरी मुलाची पोलिसांकडे तक्रार, पोलिसांनी काय केलं पाहा; तुम्हीही कराल कौतुक

समाजात एकोपा वाढवण्याच्या आणि विश्वास निर्माण करण्याच्या हेतूने उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील पोलिसांनी स्थानिक शाळांमधील मुलांमधील वाद सोडवले.  

शिवराज यादव | Updated: Dec 2, 2024, 09:38 PM IST
'माझ्या मित्राने शार्पनर चोरलंय', शाळकरी मुलाची पोलिसांकडे तक्रार, पोलिसांनी काय केलं पाहा; तुम्हीही कराल कौतुक  title=

समाजात पोलिसांप्रती विश्वास वाढवण्याच्या हेतूने पोलिसांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. हरदोई पोलिसांनी परिसरातील शाळांमध्ये गुलाबी बॉक्स बसवले आणि विद्यार्थ्यांना शाळेत येणाऱ्या समस्यांबद्दल निनावी तक्रारी सादर करण्यासाठी बॉक्स वापरण्यास सांगितलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांना दर मंगळवारी शाळेला भेट देऊन पेट्या उघडून त्यातील तक्रारींचं निराकरण करण्यास सांगितलं होतं. 

"माननीय पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे पालन करून, नोव्हेंबर महिन्यात गुलाबी तक्रार पेट्यांमध्ये एकूण 12 तक्रार पत्रे प्राप्त झाली होती, ज्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले," असं हरदोई पोलिसांनी एक्सवरील पोस्टमध्ये शेअर करत म्हटलं आहे. 

काही विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेच्या बसमध्ये होणारा छळ, दादागिरी याची तक्रार केली. तर इतरांनी वर्गात त्यांच्या मित्रांसह होणाऱ्या भांडणाबद्दल सांगितलं. दोन मुलांनी गणिताचे प्रश्न सोडवता येत नसल्यामुळे शिक्षकांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार केली. तर एका विद्यार्थ्याने वर्गात जास्त बोलणाऱ्या वर्गमित्रांची तक्रार केली. एका मुलाने आरोप केला की त्याच्या वर्गमित्राने त्याचे शार्पनर चोरलं आहे. 

पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून गुलाबी बॉक्समधून तक्रारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. पोलिसांनी बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये ठराव मांडून भांडणात मध्यस्थी केली. दोन्ही बाजू ऐकल्या गेल्या आणि प्रकरण सामंजस्याने सोडवलं गेलं याची त्यांनी खात्री केली. 

नेटकऱ्यांकडून कौतुक

उत्तर प्रदेश पोलिसांच्या या उपक्रमाने एक्स युजर्सनी कौतुक केलं आहे. तळागाळातील समुदायात भावना निर्माण करण्यासाठी आणि प्रक्रियेत मुलांना सामील करून घेण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. एका युजरने लिहिलं की, "त्यांना त्यांची क्षमता वाढवताना आणि त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य करताना पाहणं दिलासादायक आहे."

"ते 20 वर्षीय तरुणांच्या तक्रारी घेतात का? माझी सेफ्टी पिन हरवली होती. मी सुद्धा क्लू देऊ शकतो. तो गंजलेला होता आणि थोडा वळलेलाही होता," असं एका युजरने उपहासात्मकपणे म्हटलं आहे.