मध्य प्रदेशातील एका ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील योग केंद्रात देशभक्तीवर आधारित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात परफॉर्म करत असतानाच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. यावेळी त्यांच्या हातात तिरंगा होता. परफॉर्म करत असताना ते खाली कोसळल्यानंतरही लोकांना हा त्यांच्या डान्सचाच भाग आहे असं वाटत होतं. यामुळे एकीकडे ते अखेरच्या घटका मोजत असताना लोक मात्र टाळ्या वाजवत होते. पण यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बलवीर सिंह छाबडा असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 73 वर्षांचे होते.
बलवीर सिंह छाबडा हे माजी सैनिक आहेत. या कार्यक्रमात ते 'माँ तुझे सलाम' गाण्यावर डान्स करत होते. वयाच्या 73 व्या वर्षीही हातात तिरंगा घेत त्यांचा डान्स पाहून उपस्थितही टाळ्या वाजवून कौतुक करत होते. व्हिडीओतही हे दिसत आहे. मात्र यादरम्यान ते स्टेजवर खाली कोसळले. आस्था योग क्रांतीच्या सदस्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
प्राथमिक तपासात कार्डिअॅक अरेस्टमुळे बलवीर सिंह यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं काय ते स्पष्ट होणार आहे. बलवीर सिंह यांनी अवयवदान करण्यासाठी आधीच अर्ज भरला होता अशी माहिती मिळाली आहे.
Another Sudden Death Video
Retired soldier Balbinder Chawda suffered a fatal heart attack while singing a patriotic song in Indore.
He died while being taken to the hospital.- Children kept clapping, feels that He is Performing...pic.twitter.com/hSCQxt0Svr
—(@Delhiite_) May 31, 2024
दरम्यान या घटनेमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. असं काही होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. बलवीर यांच्या मृत्यूमुळे आनंदाचं वातावरण शोकाकुळ स्थितीत बदललं आहे. बलवीर सिंह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, बलवीर सिंह परफॉर्म करत असतानाच हळूहळू खाली कोसळतात. पण हे ज्याप्रकारे झालं ते पाहून उपस्थितांना ते अभिनयच करत आहे असं वाटलं. यामुळे कोणीही त्यांच्याकडे आलं नाही. जवळ उभ्या एका व्यक्तीने खाली पडलेला तिरंगाही उचलला. पण बराच वेळ झाल्यानंतरही बलवीर सिंह उठत नाहीत हे पाहिल्यावर त्यांना शंका आली आणि स्टेजवर येऊन त्यांची पाहणी केली. ते उठत नसल्याचं लक्षात आल्यानंत त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.