चौथीच्या विद्यार्थ्यांचं वर्गात भांडण, तिघांनी मिळून मित्राला तब्बल 108 वेळा कर्कटकाने भोसकलं अन् नंतर....: पालक हादरले

वर्गात मस्ती करत असतानाच विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं. यावेळी तिघांनी मिळून एका विद्यार्थ्याला कर्कटाने भोसकलं.   

शिवराज यादव | Updated: Nov 27, 2023, 12:35 PM IST
चौथीच्या विद्यार्थ्यांचं वर्गात भांडण, तिघांनी मिळून मित्राला तब्बल 108 वेळा कर्कटकाने भोसकलं अन् नंतर....: पालक हादरले title=

मध्य प्रदेशातील इंदूर येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका खासगी शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांनी चक्क कर्कटकाने आपल्या मित्राला भोसकलं. विद्यार्थ्यांनी एक, दोन नव्हे तर तब्बल 108 वेळा त्याच्यावर कर्कटकाने वार केले. ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. एकमेकांची मस्करी करत असताना अचानक विद्यार्थ्यांमध्ये हे भांडण झालं. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

शहराच्या एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गरिमा विद्या विवाह शाळेत हा प्रकार घडला आहे. चौथीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग नेहमीप्रमाणे भरलेला होता. दरम्यान शिक्षकाला सुट्टी असल्याने विद्यार्था मस्ती करत होते. अशीच मस्ती करत असताना तीन विद्यार्थ्यांचा आपल्या सहकारी विद्यार्थ्याशी वाद झाला. यावेळी तीन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर कर्कटकाने वार केले. 

शाळा सुटल्यानंतर पीडित विद्यार्थी घऱी गेला. यावेळी त्याने आपल्या आई-वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन याप्रकरणी तक्रार देत जाब विचारला. मुख्याध्यापकांनी मात्र याकडे फार लक्ष न देता टाळण्याचा प्रयत्न केला. 

शाळेकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने अखेर पालकांनी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. पालकांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. मुलगा फक्त 10 वर्षांचा असल्याने पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच चौकशी समिती गठीत केली आहे. 

पोलिसांनी संबंधित तिन्ही मुलांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच जर शाळा दोषी आढळली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.