उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. आपण 10 रुपयांची लिपस्टिक मागवली असताना, पतीने 30 रुपयांची लिपस्टिक आणल्याने पत्नी थेट माहेरी निघून गेल्याची अजब घटना समोर आली आहे. वाद इतका वाढला की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. इतकंच नाही तर घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं. पत्नीला 30 रुपयांची लिपस्टिक इतकी महाग वाटली की, तिने माहेर गाठलं. पतीने आपल्यासाठी 10 रुपयांचीच लिपस्टिक आणावी असं पत्नीचं म्हणणं होतं.
पती महाग लिपस्टिक घेऊन आल्याने पत्नी नाराज झाली. तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण समुपदेशन केंद्राकडे वर्ग केलं. समुदेशन केंद्रात दोघांची समजूत काढण्यात आली.
एत्मादपूर क्षेत्रात राहणाऱ्या एका तरुणीचं मथुरा जिल्ह्यातील महावन येथे राहणाऱ्या तरुणाशी लग्न झालं होतं. 2022 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. तरुण एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता. पत्नीने पतीकडे लिपस्टिक आणण्याची मागणी केली होती. पण जेव्हा पती लिपस्टिक घेऊन घरी पोहोचला तेव्हा वाद निर्माण झाला. पत्नीने लिपस्टिक जमिनीवर फेकून देत भांडण सुरु केलं.
पत्नीने पतीकडे इतकी महागडी लिपस्टिक का आणली याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. पती विनाकारण पैसे खर्च करत असल्याचा आरोप पत्नीने समुपदेशन केंद्रात केला आहे. भविष्यासाठी तो काही पैसे वाचवत नसल्याचंही तिचं म्हणणं आहे. पत्नीने पुढे सांगितलंकी, पती 30 रुपयांची स्वस्त लिपस्टिकही आणू शकत होता. पण त्याने माझं म्हणणं ऐकलं नाही.
दुसरीकडे पतीचं म्हणणं होतं की, 30 रुपयांपेक्षा कमी किंमतीची लिपस्टिक आपल्याला मिळत नव्हती. त्यामुळे आपण ती लिपस्टिक घेऊन आलो होतो. याच गोष्टीवरुन दोघांमध्ये भांडण झालं होतं. पत्नी गेल्या एक महिन्यापासून माहेरी राहत आहे.
प्रकरण समुपदेशन केंद्रात पोहोचल्यानंतर समुपदेशक सतीश खीरवार यांनी सांगितलं की, महागड्या लिपस्टिकवरुन दोघांमध्ये वाद झाला होता. पत्नीची पैसे वाचवण्याची इच्छा आहे. पत्नीला समजावण्यात आलं आहे. सध्या दोघांची समजूत काढण्यात आली असून, वाद मिटला आहे.