#DelhiResults2020: दिल्लीचा गड येणार, पण सिंह.?? मनिष सिसोदिया पिछाडीवर

राज्यभरात विजय मिळत असूनही सध्या 'आप'च्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

Updated: Feb 11, 2020, 12:43 PM IST
#DelhiResults2020: दिल्लीचा गड येणार, पण सिंह.?? मनिष सिसोदिया पिछाडीवर title=

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये आम आदमी पक्ष (आप) बाजी मारताना दिसत आहे. सध्याच्या घडीला 'आप' ५० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 'आप' सहजपणे बहुमत मिळवून सत्तेत येईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील.

दिल्लीत 'आप'ची सरशी, पण भाजपचाही मोठा फायदा

मात्र, या सगळ्या आनंदाच्या वातावरणातही 'आप'ला मोठी चिंता लागून राहिली आहे. कारण, 'आप'मधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सध्या पिछाडीवर आहेत. ते पटपडगंज या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी त्यांना भाजपचे रविंदर सिंह कडवी टक्कर देताना दिसत आहेत. मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर मनीष सिसोदिया तब्बल १५०० मतांनी पिछाडीवर आहेत. आतापर्यंत मनीष सिसोदिया यांना २२,९०१ आणि रविंदर सिंह यांना २४,४७७ मते मिळाली आहेत. त्यामुळे राज्यभरात विजय मिळत असूनही सध्या 'आप'च्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. 

#DelhiAssemblyResults2020 Live Updates : दिल्लीत पुन्हा 'आप'च

दरम्यान, मतमोजणीच्या चार तासांनंतर आप दिल्ली विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. सध्याच्या घडीला आप ५८ आणि भाजप १२ जागांवर आघाडीवर आहे. निकालांचे प्रारंभिक कल पाहता आम आदमी पक्षाला (आप) बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहील. तर काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता येणार नाही, असे चित्र आहे.