Pulwama Attack : ...तरच नियंत्रण रेषा नियंत्रणात राहील, कमल हसनचा नेतेमंडळींना सल्ला

सरकारला कशाची भीती?, हसन यांचा थेट सवाल 

Updated: Feb 18, 2019, 01:17 PM IST
Pulwama Attack : ...तरच नियंत्रण रेषा नियंत्रणात राहील, कमल हसनचा नेतेमंडळींना सल्ला  title=

चेन्नई : काश्मीरमध्ये सार्वमत का घेण्यात येत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत अभिनेते कमल हसन यांनी भारत सरकारसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. सार्वमताचा निर्मय घेण्याची सरकाला का भीती वाटत आहे, असा थेट सवाल त्यांनी चेन्नईतील एका कार्यक्रमादरम्यान विचारला. चेन्नईत आयोजित करण्यात आलेल्या मक्कल निधी मय्यम या त्यांच्या पक्षाच्याच एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांनी काश्मीरमध्ये सार्वमताची मागणी करत, जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हदशतवादी हल्ल्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. सैनिकांचे प्राण जातातच कसे? या देशाचे, आपल्या घराचे रक्षक धारातीर्थी पडतातच कसे? असे थेट प्रश्न त्यांना यावेळी उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या बोलण्याचा रोख हा सरकारच्या दिशेने होता. दोन्ही राष्ट्रांतील राजकीय नेतेमंडळींची वर्तणूक नीट राहिली चर, एकाही जवानाच्या जीवाला धोका नाही. कोणत्याच सैनिकाला प्राण गमवावे लागणार नाहीत, ही बाबही त्यांनी स्पष्ट केली. नेतेमंडळींची भूमिका नीट राहिली तर, नियंत्रण रेषाही नियंत्रणात राहील असं सूचक विधान त्यांनी केलं. 

कमल हसन यांचं हे वक्तव्य पाहता आता सत्ताधारी पक्षाकडून त्यांना काही उत्तर मिळणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सध्या संपूर्ण देशात पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात असून, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी देशभरातून आणि विविध क्षेत्रांतून, स्तरांतून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्व राजकीय पक्ष या प्रसंगी एकत्र आले असून, आता या हल्ल्याचं उत्तर नेमकं कसं दिलं जाणार साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे.