...तर आंदोलन करु; अमित शाहंना कमल हसन यांचा इशारा

जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण 

Updated: Sep 16, 2019, 04:05 PM IST
...तर आंदोलन करु; अमित शाहंना कमल हसन यांचा इशारा  title=

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी दिवसाच्या निमित्ताने दैनंदिन जीवनातही हिंदीचा वापर व्हावा या आशयाला अधोरेखित करत देशाच्या राष्ट्रभाषेविषयी केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आलेलं वादळ काही केल्या शमलेलं नाही. हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हीच भाषा राष्ट्रात एकता ठेवण्याचं काम करेल ही बाब त्यांनी अधोरेखित केली होती. 

दक्षिण भारतातून शाह यांच्या यात मतप्रदर्शनाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये अभिनयाकडून राजकारणाकडे वळणाऱ्या अभिनेता कमल हसन यांचाही समावेश आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत याविषयी आपलं ठाम मत मांडलं आहे. 
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला उमगलेला प्रजासत्ताक भारत सर्वांसमोर आणला आहे. शासनाने कोणताही कायदा आणण्यापूर्वी सर्वसामान्यांशी चर्चा केली पाहिजे, असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं. सोबतच त्यांनी असं न झाल्यास आपण आंदोलन करु.... असा इशाराही दिला. 

'विविधतेत एकता असल्याचं आपण तेव्हाच म्हणालो होतो ज्यावेळी भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र असल्याचं आपण जाहीर केलं होतं. आम्ही प्रत्येक भाषेचा आदर करतो. पण, तामिळ हीच आमची मातृभाषा आहे. भाषेसाठीचा लढा हा अधिक व्यापक प्रकारचा असेल. भारत किंवा तामिळनाडूला अशा प्रकारच्या कोणत्याच लढ्याची गरज नाही. जवळपास संपूर्ण देशच राष्ट्रगीत हे बंगाली भाषेत गातो. तेही अभिमानाने. हे सारंकाही असंच सुरू राहणार आहे', असं हसन म्हणाले. 

ज्या व्यक्तीने राष्ट्रगीत लिहिलं त्यांनी सर्व भाषां आणि संस्कृतींना राष्ट्रगीतात अपेक्षित आदर दिला. म्हणून तर ते गीत आपलं राष्ट्रगीत ठरलं ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. हिंदी दिनाचं औचित्य साधत शाह यांनी केलेल्या एका वक्तव्याविषयी द्रमुक, तामिळनाडू काँग्रेस कार्यकारिणी आणि इतर काही स्थानिक राजकीय पक्षांनी नाराजीचा सुर आळवला होता.