Adani Hindenburg Case: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, SEBI ला आदेश

Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीला चौकशीचा आदेश दिला असून तज्ज्ञ समितीची स्थापन केली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एएम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने सेबीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.   

Updated: Mar 2, 2023, 02:21 PM IST
Adani Hindenburg Case: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, SEBI ला आदेश title=

Adani Hindenburg Case: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात (Hindenburg Report on Adani) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सेबीला (SEBI) चौकशीचा आदेश दिला आहे. सेबीच्या नियमांचं उल्लंघन झालं का? तसंच स्टॉकच्या किंमतींमध्ये (Stock Price) फेरफार केला आहे का? याची सेबीकडून चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सेबी आधीच या प्रकरणाची चौकशी करत असून दोन महिन्यात अहवाल सादर करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. 

तज्ज्ञ समितीची स्थापना

सुप्रीम कोर्टाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एएम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने एकूण सहा सदस्यीय समिती स्थापन केली असून यामधअये एएम सप्रे यांच्यासह ओपी भट्ट, न्यायमूर्ती जेपी देवदत्त, केव्ही कामत, एन नीलेकणी, सोमशेखर सुंदरसन यांचा समावेश आहे.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने सेबीला तज्ज्ञ समितीला चौकशीत सहाकर्य करण्यास सांगितलं आहे. उद्योगपती गौतम अदानी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

गौतम अदानींचं ट्वीट

"अदानी ग्रुप सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत आहे. वेळ मर्यादेत सर्व गोष्टी समोर येतील आणि सत्याचा विजय होईल," असा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला आहे. 

अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत.  हिंडेनबर्गने अदानी समूहाने गुंतवणुकीत गैरप्रकार केल्याचा अहवाल सादर केल्यानंतर देशात मोठी खळबळ उडाली होती. याचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवरही मोठ्या प्रमाणात झाला. इतकंच नाही तर अदानी समूहाने आपला ‘एफपीओ’ रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर स्वत: गौतम अदानी यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत यामागील कारण सांगत गुंतवणूकदरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही.  

दुसरीकडे हा अहवाल सादर झाल्यापासून गौतम अदानी यांना प्रचंड मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत सतत घसरण होत असून ते श्रीमंतांच्या य़ादीत फार खाली घसरले आहेत.