नवी दिल्ली : देशात एकीकडे 'तिसरं लिंग' म्हणून दर्जा देण्यावर चर्चा सुरू असताना विमान कंपनी 'एअर इंडिया'नं एका ट्रान्सजेन्डरला नोकरी द्यायला नकार दिला. त्यामुळे या ट्रान्सजेन्डरनं आता राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यू देण्याची विनंती केलीय.
शानवी पोन्नुस्वामी हिनं एअर इंडियामध्ये केबिन क्रूची सदस्य म्हणून नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, तिचा हा अर्ज एअर इंडियानं नाकारला. त्यानंतर गेल्या वर्षी शानवीनं सर्वोच्च न्यायालयात कंपनीच्या या निर्णयाला आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधी एअर इंडिया आणि नागरी उड्डान मंत्रालयाला चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितलं होतं.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या आपल्या पत्रात शानवीनं केलेल्या दाव्यानुसार, एअर इंडिया किंवा नागरी उड्डाण मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिशीला अद्याप उत्तर दिलेलं नाही.
नोकरीशिवाय आपला उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला इच्छामृत्यू दिला जावा, अशी विनंती तिनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केलीय.
'ट्रान्स राइटस् नाऊ कलेक्टिव्ह' नावाच्या फेसबुक पेजवर शानवीनं एक पत्र लिहिलंय. 'हे स्पष्ट दिसतंय की भारत सरकार माझ्या आयुष्याच्या आणि रोजगाराच्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी तयार नाही... मीही माझा उदरनिर्वाह भागवण्यास असक्षम ठरतेय. अशावेळी सर्वोच्च न्यायालयात लढाईसाठी वकिलांना पैसे देणंही शक्य नाही' असं शानवीनं आपल्या पत्रात म्हटलंय.
'ग्राहक सहाय्यक कार्यकारी म्हणून मी एअर इंडियामध्ये एक वर्षभर नोकरी केली परंतु, त्यानंतर लिंग परिवर्तन करणारी शस्रक्रिया केली. त्यानंतर दोन वर्षांच्या काळात चार वेळा नोकरीसाठी अर्ज केला परंतु, प्रत्येकवेळी नोकरी नाकारण्यात आली' असंही शानवीनं आपल्या पत्रात म्हटलंय.