नवी दिल्ली : हैदराबादमधील निर्भयाच्या आरोपींचं एन्काऊंटर होताच आता दिल्लीतील निर्भयाच्या दोषींनाही फाशी देण्यासाठी हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींची दयायाचिका केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. दोषींना दया दाखवण्यात येवू नये, त्यांची दयायाचिका फेटाळण्यात यावी अशी शिफारसही दिल्लीच्या नायब राज्यपालांनी केली आहे.
हैदराबादच्या दिशाला न्याय मिळाल्यानंतर आता निर्भयाला देखील न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची दया याचिका गृहमंत्रालयानं राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. ही याचिका रद्द करण्याचा शिफारस करण्यात आली आहे.
एन्काऊंटर नंतर पीडितेच्या वडिलांनी म्हटलं की, 'माझ्या मुलीला न्याय मिळाला. माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली.' तर पीडितेच्या काकांनी म्हटलं की, 'या एन्काऊंटरनंतर आमची मुलगी परत येणार नाही. पण देशातील इतर मुलींसोबत असं कृत्य करणाऱ्यांच्या मनात नक्कीच भीती वाढेल.'
६ डिसेंबरच्या सकाळी अचानक बातमी आली. हैदराबादमधल्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणी चारही आरोपींचं एन्काऊण्टर करण्यात आलं. आरोपी मोहम्मद आरिफ, जोलु शिवा, जोलु नवीन, चेन्नाकेशावुलूचं एन्काऊण्टर करण्यात आलं. हे चौघेही २० ते २४ वयोगटातले आहेत.
गुन्हा कसा घडला, याचं रिक्रेएशन करण्यासाठी चारही आरोपींना मध्यरात्री घटनास्थळी नेण्यात आलं होतं. पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांच्या माहितीनुसार, त्यावेळी आरोपींनी पोलिसांची शस्त्रं घेऊन पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी पोलिसांनी स्वताच्या बचावासाठी केलेल्या गोळीबारात हे चारही आरोपी ठार झाले.