हैदराबाद : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर गँगरेप करुन, तिची जाळून हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन जात असताना, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी चौघांचं एन्काऊंटर केलं. चौघांच्या एन्काऊंटरनंतर देशभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
आरोपींच्या एन्काऊंटरनंतर हैदराबादमध्ये सकाळी शालेय विद्यार्थीनी बसमधून आपल्या शाळेत जात असताना, त्यांनी आनंदाने ओरडत या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी जमलेली गर्दी विद्यार्थीनींचा व्हिडिओ चित्रीत करत होती. विद्यार्थिनी तेथे असलेल्या पोलिसांना पाहून आपल्या आनंद व्यक्त करत होत्या.
#WATCH Hyderabad: Reaction of girl students when news of encounter of the accused in murder and rape of woman veterinarian broke out pic.twitter.com/z238VVDsiC
— ANI (@ANI) December 6, 2019
शाळकरी विद्यार्थीनींची ही बस त्याच उड्डाणपुलावरून जात होती, जिथे आरोपींनी महिला डॉक्टरांसह दुर्घटना केली होती.
हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला महिला डॉक्टरसोबत सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर पीडित महिलेला जाळून तिची हत्या करण्यात आली. २७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन तिला हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर जाळण्यात आलं. चारही आरोपींना २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. यानंतर आज त्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे.