Pet Parrot Revealed Who Killed Owner: एखाद्या पाळीव प्राण्याच्या मदतीने गुन्ह्याची उकल झाल्याचा प्रकार यापूर्वी तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिला असेल. अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाच्या हॉलीडे चित्रपटामध्येही एका कुत्र्याच्या मदतीने अक्षय कुमार अपहरण झालेल्या बहिणीचा माग काढतानाचा सीनही प्रचंड गाजला होता. मात्र अशा गोष्टी फक्त चित्रपटांमध्येच होतात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. आग्रा येथील एका महिलेच्या हत्येमध्ये पोलिसांनी चक्क एका पाळीव पोपटाची मदत घेतली. विशेष म्हणजे कोर्टानेही पोपटाची साक्ष ग्राह्य धरत आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र या महिलेला न्याय मिळवून देणाऱ्या पोपटाचीही मृत्यू झाला आहे.
पोपट हा पक्षी त्याच्या हुशार बुद्धीबरोबरच एकदा पाहिलेली गोष्ट न विसरण्यासाठीही ओळखला जातो. पोपट हा एकमेव असा पक्षी आहे जो मानवाला समजणाऱ्या भाषेत बोलू शकतो. याचाच फायदा उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एक हत्येचं प्रकरण सोडवण्यासाठी झाला. येथील विजय शर्मा नावाच्या व्यक्तीची पत्नी नीलम यांची हत्या 9 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये आता कोर्टाने नीलम यांचा भाचा आशुतोष गोस्वामी आणि त्याचा मित्र रॉनी मैसी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून 72 हजारांचा दंडही सुनावण्यात आला आहे. नीलम यांच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 महिन्यांमध्ये या पोपटाचाही मृत्यू झाला होता. मात्र त्याने मृत्यूपूर्वी आरोपींबद्दलची माहिती दिली होती. या पोपटाने आरोपींची नावं घरच्यांना आणि पोलिसांना सांगितली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आणि आरोपी जाळ्यात अडकले.
नीलम शर्मा यांचे पती विजय हे त्यांची मुलगी आणि मुलाबरोबर लग्नानिमित्त फिरोजाबादला गेले होते. नीलम या काही कारणास्तव घरीच थांबल्या होत्या. लग्नावरुन हे तिघेही परत आले तेव्हा नीलम आणि त्यांचा पाळीव कुत्रा जॅकी याची कोणीतरी चाकूने हत्या केली होती. घरातील मौल्यवान वस्तू, दागिणे आणि कॅश गायब असल्याचंही दिसून आलं.
नीलम यांची हत्या करण्यात आली तेव्हा हा पोपटही घरातच होता. मात्र नीलम यांच्या हत्येनंतर हा पोपट पूर्वीपेक्षा फारच शांत झाल्याचं घरच्यांना जाणवलं. नीलम यांनी या पोपटाला लळा लावला होता. पोपट शांत असल्याचं पाहून घरच्यांना शंका आली. त्यांनी एकदा ठरवून पोपटासमोर रडारड सुरु केली आणि "तुझ्यासमोर नीलमची हत्या झाली आणि तू काहीच केलं नाहीस. सांग कोणी मारलं नीलमला?" असं म्हटलं. त्यानंतर विजय यांनी पोपटासमोर त्यांच्या घरी नेहमी येणाऱ्या आणि ज्यांच्यावर शंका आहे अशा लोकांची नावं घेतली. विजय यांनी भाचा आशूचं नाव घेतल्यानंतर पोपट मोठमोठ्याने ओरडू लागला. पोपट मोठमोठ्याने "आशू-आशू" असं ओरडू लागला. पोपटाची ही प्रतिक्रिया पाहून घरच्यांना आशूनेच नीलमची हत्या केल्याची शंका नक्कीच खरी असणार असं वाटलं. त्यानंतर विजय यांनी पोलिसांना याबद्दल कळवलं. पोलिसांनी आशूला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने गुन्हा कबुल केला.
नीलम यांचं आपल्या भाच्यावर फार प्रेम होतं. आशू नेहमी घरी यायचा जायचा. आशूला घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती. पैशाची हाव निर्माण झाल्याने त्याने आपल्याच आत्याची हत्या केली. आशूने 14 वेळा नीलम यांच्यावर चाकूने वार केले. ही सर्व घटना पोपटाच्या डोळ्यासमोरच घडली. या पोपटामुळेच पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले.