Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द

Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे.  

Updated: Mar 24, 2023, 03:15 PM IST
Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द title=

Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, वायनाडचे खासदार 23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. सूरत येथील कोर्टाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. त्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. राहुल गांधी आज सकाळी लोकसभेत आले. त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी करत काँग्रेस खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये धाव घेतल्याने गोंधळ उडाला. काही वेळाने लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. काँग्रेसने आज देशाच्या राजधानीत मोठ्या आंदोलनाची योजना आखली होती. त्याचवेळी आज सकाळी संसदेतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात विरोधकांची बैठक झाली होती.

मानहानी प्रकरण नेमके काय आहे ?

राहुल यांनी मोदी आडनावावरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या मानहानी गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.  2019 रोजी कर्नाटकातील एका सभेत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्यावर सूरत येथे गुन्हा दाखल झाला होता.  2019 मध्‍ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांची सभा होती. यावेळी त्‍यांनी मोदी यांच्‍या नावावरुन वादग्रस्त विधान केले होते. देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याप्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता. 

कोणत्या कायद्यानुसार राहुल गांधी यांच्यावर कारवाई?

- लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत सदस्यत्व रद्द होण्याची स्पष्ट कारणे देण्यात आली आहेत. 
- लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 अनुसार, एखाद्या फौजदारी प्रकरणात दोषी ठरल्यास खासदारकी रद्द करण्यात येते. 
- 2 किंवा 2 पेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास आमदार किंवा खासदारकीचं सदस्यत्व रद्द होतं
- कलम 8(3)नुसार फौजदारी खटल्यात दोषी लोकप्रतिनिधीला दोषी ठरवण्यात आल्याच्या दिवसापासून 6 वर्ष तो व्यक्ती कोणतीही निवडणूक लढू शकत नाही
- कलम 8(1) नुसार दोन समाजात तेढ निर्माण करणं, भ्रष्टाचार, गैरवर्तन यामुळे कारवाई होऊ शकते
- 2022मध्ये समाजवादी पक्षाचे नेते चिथावणीखोर वक्तव्यांप्रकरणी आझम खान यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.

खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, कोर्टाने त्यांना जामीनही मंजूर केला. सूरत कोर्टाच्या या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झालेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तहसील कार्यालयासमोर इंदापूर काँग्रेसकडून घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी मोदी सरकार हाय हाय……आवाज दाबणाऱ्या सरकारचा निषेध अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.