नवी दिल्ली : अतिरिक्त शेतकीय आणि वन्यविषयक सामग्री, शैक्षणिक पुस्तकांची विक्री करणारी दुकानं आणि वीजेवर चाणारे पंखे (निर्मिती), ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा, मोबाईलसाठीच्या प्रीपेड रिचार्ज सेवा या साऱ्याला Coronavirus कोरोना विषाणूमुळे सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमधून सवलती देण्यात आल्या आहेत.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास गृह मंत्रालयाकडून याविषयीची माहिती देण्यात आली. लॉकडाऊन काळात नेमक्या कोणत्या सवलती देण्यात येणार आहेत आणि कोणत्या गोष्टींवरव निर्बंध कायम असणार आहेत याबाबतच संभ्रमाची परिस्थिती पाहायला मिळत असल्याचं लक्षात येताच ही माहिती स्पष्ट करण्यात आली.
शहरी भागात असणारे ब्रेडचे कारखाने, पीठाची गिरणीसुद्धा ल़ॉकडाऊनच्या या काळात सुरु राहणार आहे. शिवाय ३ मे पर्यंत सुरु अणाऱ्या या लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक पुस्तकांची विक्री करणारी दुकानं, इलेक्ट्रीक फॅन अर्थान पंखा विक्री करणारी दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्याच घरी राहून त्यांची काळजी घेणारे व्यक्ती (कर्मचारीय सेवक) यांनाही या लॉकडाऊनच्या नियमांतून वगळण्यात आलं आहे. शिवाय विविध दूरध्वनी सेवा पुरवण्यासाठी म्हणून मोबाईलच्या प्रीपेड रिचार्जची विक्री करणारी दुकानंही या काळात सुरु राहतील.
लॉकडाऊनच्या या काळात राज्यांतर्गत वृक्षरोपण सामग्री, मधमाशी पालन आणि उत्पादनाची कामं सुरु राहणार आहेत. वन्य विभाग कार्यालय आणि त्याच्याशी निगडीत इतर कामं, नागरी कामं या सर्व गोष्टी लॉकडाऊनच्या काळात सुरु राहतील. दरम्यान, काही अंशी कारभार सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरीही कारखाने, कार्यालये या ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन केलं जावं असंही सांगण्यात आलं आहे.