मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालाकोट एअर स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. एअर स्ट्राईक पाकिस्तानमध्ये नाही तर भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये केला गेला. त्यामुळे पाकिस्तानच्या घरात घुसून दहशताद्यांना मारलं असा याचा अर्थ होत नसल्याचं शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात घुसून मारू असं म्हणायचे, त्यामुळे लोकांना बरं वाटायचं आणि हा माणूस मजबूत आहे, असं वाटलं. पण पाकिस्तानच्या घरात घुसून काहीही केलं नव्हतं. सीमा आणि सीमेची परिस्थिती माहिती नसल्याचा गैरफायदा घेतला गेला, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवारांनी केलेल्या या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळी विधानं केली आहेत. जनता अडाणी आहे आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी त्यांची कल्पना असेल तर त्याला काहीही अर्थ नाही, असं भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले. त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये एवढी उलट सुलट विधानं केली आहेत, त्यामुळे त्यांच्या कोणत्या वक्तव्य खरं समजायचं आणि त्यावर विश्वास ठेवायचा हा मुद्दा असल्याचंही माधव भांडारी म्हणाले.
एअर स्ट्राईकबद्दलचा संभ्रम हा शरद पवार यांच्या मनात आहे, जनतेच्या मनात नाही. हे निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झालं आहे, असं वक्तव्य माधव भांडारी यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं.
p>