इंदोर : केंद्रीय नागरी उड्डान राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी विमान प्रवास अत्यंत स्वस्त झाला असून, तो रिक्षाभाड्यापेक्षाही कमी दरात करणे शक्य झाल्याचा दावा केला आहे. आपले वक्तव्य ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण, हे वास्तव आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले. इंदोर येथील मॅनेजमेंट असोशिएशनच्या (आयएमए) २७व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते.
सिन्हा यांनी आपला दावा अधिक विस्तारीत स्वरूपात करताना स्वस्त विमान प्रवासाचे गणीत समजून संगितले. ते म्हणाले, सध्यास्थितीत दिल्लीहून इदोरला हवाईमार्गे येण्यासाठी प्रती किलोमीटर पाच रूपये इतका खर्च येतो. तर, याच शहरादरम्यानचा प्रवास रिक्षाणे केल्यास तो ८ ते १० रूपये प्रती किलोमीट इतका येतो.
पुढे बोलताना सिन्हा म्हणाले, जगातील सर्वात कमी खर्चात हवाई प्रवास देशात उपलब्ध झाल्यामुळे अनेक लोक हे हवाई प्रवासाला प्राधान्य देत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही अर्थसंकल्पदरम्यान, हवाई चप्पल वापरणारा व्यक्तीही आता हवाई जहाज वापरत आहे, असे वक्तव्य केले होते. चार वर्षापूर्वी देशात हवाई प्रवास करणाऱ्य़ांची संख्या ११ कोटी इतकी होती. तीच संख्या ३१ मार्चला संपत असलेल्या आर्थिक वर्षात २० कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे, असेही सिन्हा म्हणाले.