नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आल्यापासून गाईला फार महत्त्व देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. गाईंबद्दलच्या कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या गाईंच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. कांजी हाऊसचे नाव बदलून गो-संरक्षण केंद्र ठेवण्यात आले आहे. गो कल्याणासाठी सेस लागू करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने दारूवर देखील 2 टक्के 'गो कल्याण सेस' लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आश्रय नसलेल्या गाईंसाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. पण आता सेस देऊनही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपला एका दिवसाचा पगारही द्यावा लागणार आहे. अलीगडमधील जिल्हाधिकाऱ्याने बुधवारी एक पत्र लिहून एक दिवसाचा पगार जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
बुधवारी अलिढच्या जिल्हाधिकाऱ्याने दिलेल्या पत्रानुसार जानेवारी महिन्यातील एक दिवसाचा पगार कापून सिंडिकेट बॅंक करावा असे आदेश देण्यात आले आहेत. गोवंश कल्याण आणि पोषणासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार सोसायटी फॉर एनीमल वेल्फेअर अलीगढच्या सिंडिकेट बॅंकेतील रामघाट शाखेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी 851420100028545 हा खाते क्रमांक तर SYNB0008514 हा आयएएफसी कोड देण्यात आला आहे.
भटक्या जनावरांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योगी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सर्व ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्थांमध्ये अस्थायी 'तात्पुरते गोवंश निवारा केंद्रा'ची स्थापना आणि संचालन' लागू करण्यात आले होते. यानुसार ग्राम पंचायत, क्षेत्र पंचायत, जिल्हा पंचायत, नगर पंचायत, नगर पालिका आणि नगर निगम क्षेत्रात तात्पुरते गोवंश निवारा केंद्र उभारले जातील. यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून पैसे गोळा करत तसेच टॅक्स वसूल करत निधी उभारत आहे.