अंथरुणाला खिळलेल्या अमर सिंगनी मागितली बिग बींची माफी

अमिताभ बच्चन आणि अमर सिंग यांची कधीकाळी घट्ट मैत्री होती.

Updated: Feb 18, 2020, 10:23 PM IST
अंथरुणाला खिळलेल्या अमर सिंगनी मागितली बिग बींची माफी

मुंबई : अमिताभ बच्चन आणि अमर सिंग यांची कधीकाळी घट्ट मैत्री होती. बच्चन यांच्या कुठल्याही सोहळ्यात अमरसिंग असायचेच. अगदी बच्चन कुटुंबीयांमधलेच एक असे ते झाले होते. पण काही वर्षांपूर्वी या दोस्तीत बॉलिवूडच्या भाषेत दरार पडली आणि हे दोस्त दुरावले. सध्या अमर सिंग सिंगापूरमध्ये उपचार घेत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी कटुता विसरुन जावी, म्हणून अमरसिंगांनी अमिताभ बच्चन यांची माफी मागितली आहे.

गेली दहा वर्षं या दोन मित्रांमध्ये संवाद नाही. पण अमर सिंह यांच्या वडिलांच्या स्मृतीदिनादिवशी अमिताभ बच्चन अमर सिंहांना आवर्जून मेसेज पाठवतात. तसाच याही वर्षी अमिताभ बच्चन यांनी मेसेज पाठवला आणि अमर सिंहांना गहिवरुन आलं.

बच्चन कुटुंबीयांबाबत काही वर्षांपूर्वी अमर सिंगांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. अमिताभ आणि जया दोघे वेगवेगळे प्रतीक्षा आणि जनक अशा वेगवेगळ्या बंगल्यात राहायचे.

ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचं एकमेकांशी पटत नाही, अशी वक्तव्यं अमर सिंह यांनी एका मुलाखतीत केली होती. तसंच अमर सिंहांची सपामधून हकालपट्टी झाल्यानंतर जया बच्चन यांनी पक्ष सोडावा, अशी अमर सिंगांची इच्छा होती. पण जया बच्चन यांनी अमर सिंगांचं ऐकलं नाही, असं सांगितलं जातं. अशा विविध कारणांवरुन या दोघा मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.

आता अमर सिंगांची जगण्या-मरण्याची लढाई सुरू असताना आयुष्याच्या संध्याकाळी अमर सिंगांना हे सगळं विसरायचंय. पण त्याचवेळी जैसे ज्याचे कर्म जैसे, फळ देतो रे ईश्वर याचीही आठवण अमर सिंगांनी करुन दिली. आता प्रतीक्षा आहे ती अमिताभ बच्चन या मित्राबदद्ल काय म्हणतात, त्याची.