भाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोर

Amarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी. बर्फाचे शिवलिंग वितळल्याचे समोर आले आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 6, 2024, 10:20 AM IST
भाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोर title=
प्रातिनिधीक फोटो

Amarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. बर्फाचे शिवलिंग वेळेच्या आधीच वितळले आहे. त्यामुळं आता भाविक बाबा बर्फानीच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकणार नाहीयेत. वाढत्या गर्मीमुळं शिवलिंग वितळले असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान आज खराब हवामानामुळं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. बालटाल आणि पहलगाम हे दोन्ही मार्ग स्थगित करण्यात आले आहेत. वातावरण पून्हा पूर्वीसारखे होताच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 

आत्तापर्यंत जवळपास दीड लाख भाविकांनी बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे. तर, 19 ऑगस्टपर्यंत यात्रा सुरू राहणार आहे. यात्रेच्या पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक भाविकांनी हजेरी लावली होती. मात्र, आत्ता अमरनाथमध्ये आलेल्या भाविकांच्या पदरी निराशा पडली आहे. अमरनाथच्या पवित्र गुफेतील बर्फाचे शिवलिंग पूर्णपणे वितळले आहे. त्यामुळं भाविकांना बाबा बर्फानीचे दर्शन घेता येणार नाहीये. 

शिवलिंग वितळण्याबाबत काय म्हणाले अधिकारी?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक आठवड्यात तापमानात वाढ झाल्यामुळं शिवलिंग वितळण्याची प्रक्रिया गतीने पार पडली. 2008मध्ये पहिल्यांदा यात्रा सुरू झाल्यानंतर 10 दिवसांच्या आतच शिवलिंग पूर्णपणे वितळले आहे. या वर्षी अमरनाथ यात्रा 52 दिवसांची असून 29 जून रोजी सुरू होऊन 19 ऑगस्टला संपणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक आठवड्यापासून जम्मू -काश्मीरमध्ये उष्णतेची लाट आणि तापमान वाढले होते. यामुळं शिवलिंग वितळले आहे. 6 दिवसांतच शिवलिंग वितळले आहे. आज मात्र जम्मू काश्मीरमध्ये पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळं आज अमरनाथची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळं भाविकांना आज दर्शनाचा लाभ घेता येणार नाहीये.

एका प्रशासनिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देश आणि जगातील विभिन्न भागातून एकूण 30,586 भाविकांनी यात्रेच्या पाचव्या दिवशी अमरनाथ बाबाचे दर्शन घेतले. 3 जुलै रोजी बालटाल आणि नुनवान-पहलगामच्या मार्गे भगवान शिव यांच्या पवित्र गुफेत पूजा-अर्चना करण्यात आली. एका रिपोर्टनुसार, 2023 साली तीर्थयात्रेच्या 10 व्या दिवशी एक लाखांचा आकडा पार केला होता. 3888 मीटर उंचीवर असलेल्या या गुफेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या गुफेत भगवान शिव वास करतात अशी मान्यता आहे. ही गुहा उत्तर भारतातील हिमालयात आहे.