नवी दिल्ली: केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान नसते तर मी कोलकत्यामधून सहीसलामत परतलो नसतो, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. ते बुधवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.कोलकातामध्ये मंगळवारी संध्याकाळी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी आणि दगडफेक झाली. यावेळी रस्त्यावर अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या सगळ्यासाठी तृणमूल काँग्रेसलाच जबाबदार धरले.
यावेळी अमित शहा यांनी आणखी एक खुलासा केला. कोलकात्यामध्ये सीआरपीएफची सुरक्षा नसती तर मी सहीसलामत बाहेर पडू शकलो नसतो. माझ्या रोड शो पूर्वी रस्त्यावरील माझे सर्व पोस्टर्स उतरवण्यात आले. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. जवळपास अडीच तास रोड शो शांततेत सुरु होता. यादरम्यान रोड शो वर तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तिसऱ्या हल्ल्याच्यावेळी केरोसीन बॉम्ब फेकून जाळपोळ करण्यात आली. या सगळ्याच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेस मतदारांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अमित शहा यांनी केला.
BJP President Amit Shah on violence at his roadshow in Kolkata yesterday: Had CRPF not been there, it would have been really difficult for me to escape, BJP workers were beaten up, TMC can go to any extent, it's with luck that I made it out. #WestBengal pic.twitter.com/GksBpZA2iY
— ANI (@ANI) May 15, 2019
तसेच तृणमूल काँग्रेसने केलेल्या हिंसाचाराविरोधात निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणीही भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये सराईत गुन्हेगारांना निवडणुकीत मोकळे सोडून देण्यात आले आहे. इतर राज्यांनी पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारांना निवडणुका सुरू होण्यापूर्वीच अटक केलीय. जोपर्यंत गुंडांना अटक करण्यात येणार नाही, तोपर्यंत निष्पक्ष निवडणूक होणार नाही, असेही अमित शहा यांनी सांगितले.