पश्चिम बंगालमध्ये लोकशाही धोक्यात, अमित शहांचा आरोप

'संपूर्ण लोकसभा निवडणुकीत केवळ पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाल्याचं दिसून येतंय'

Updated: May 15, 2019, 12:42 PM IST
पश्चिम बंगालमध्ये लोकशाही धोक्यात, अमित शहांचा आरोप title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या ९ मतदारसंघांत मतदान होणार आहे. आत्तापर्यंत राज्यात झालेल्या ६ टप्प्यांतील मतदानादरम्यान भाजप आणि राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस दरम्यान वारंवार हिंसक संघर्ष पाहायला मिळाला. मंगळवारी कोलकात्यात भाजचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यन टीएमसी आणि भाजप समर्थकांमध्येही हिंसक संघर्ष झाला. भाजपच्या म्हणण्यानुसार, या हिंसोत पक्षाचे १०० हून अधिक कार्यकर्ते जखमी झालेत. तसंच ही हिंसा टीएमसीच्या विद्यार्थी संघटनेनं घडवून आणल्याचाही आरोप भाजपनं केलाय. 

कोलकातामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत अमित शाहांनी पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जीवर घणाघाती आरोप केलाय. पराभव समोर दिसत असल्यामुळे ममता बॅनर्जींनी हिंसाचार घडवला. तसंच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच इश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा उद्धवस्त केल्याचा आरोप शाहांनी केलाय. गेट बंद होतं तसंच भाजपाचे कार्यकर्ते बाहेर होते मग पुतळा कुणी तोडला म्हणत त्यांनी तृणमूलवर निशाणा साधला. कालच्या हिंसाचारात भाजपाचे १०० हून अधिक कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा पक्षानं केलाय. हिंसाचाराचा चिखल कराल तर कमळच उगवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच ममता दीदींना तुम्ही २३ तारखेची वाट पहा कारण आता तुमचे दिवस संपले असल्याचा इशाराही अमित शाहांनी यावेळी व्यक्त केला.  

याच संदर्भात भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. 'संपूर्ण लोकसभा निवडणुकीत केवळ पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाल्याचं दिसून येतंय. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही धोक्यात आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान आत्तापर्यंत तीन वेळा हल्ले घडवून आणण्यात आले. पोलिसांना माहिती असूनही त्यांनी कारवाई केली नाही. ही हिंसा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच घडवून आणला असून या हिंसेला सर्वस्वी टीएमसी जबाबदार' असल्याचा दावा अमित शहा यांनी केला. 

भाजपनंच हिंसाचार घडवून आणला असता तर प्रत्येक राज्यात हिंसा दिसली असती केवळ पश्चिम बंगालमध्ये नाही. टीएमसी केवळ ४२ जागांवर निवडणूक लढत आहे तर भाजप संपूर्ण देशभर निवडणूक लढत आहे. काल रोड शो पूर्वी तीन तास अगोदर आमचे पोस्टर बॅनर हटवण्यात आले. मोदींचेही पोस्टर फाडण्यात आले. पोलिसांनी यावेळी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असं म्हणत अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधलाय. या लोकसभा निवडणुकीत तृणमूलचा पराभव निश्चित असून बदल होणारच, असा दावाही त्यांनी यावेळी केलाय.  

अमित शहांविरोधात दोन एफआयआर दाखल

बुधवारी कोलकाता पोलिसांनी अमित शहा यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल केल्यात. जोडासांको आणि एमहर्स्ट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये या तक्रारी नोंदवण्यात आल्यात. टीएमसीच्या विद्यार्थी संघटनेच्या तक्रारीनंतर या एफआयआर दाखल झाल्याचं म्हटलं जातंय. भाजप कार्यकर्त्यांनी समाजसेवक ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती फोडल्याचा आरोपही टीएमसीनं केलाय.  

या हिंसाचाराविरोधात भाजप आज दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनही करणार आहे. भाजपनं या प्रकरणात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केलीय.