शिवसेनेच्या मंत्र्यांवर कुणाचा 'रिमोट कंट्रोल' चालतो?

भाजपच्या या उपोषणावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून टीकेचे बाण सोडण्यात आले होते. 

Updated: Apr 12, 2018, 09:36 PM IST
शिवसेनेच्या मंत्र्यांवर कुणाचा 'रिमोट कंट्रोल' चालतो? title=

नवी दिल्ली : केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेनेतले मतभेद पुन्हा एकदा उफाळून आलेत... निमित्त होतं ते भाजपच्या उपोषण आंदोलनाचं... या उपोषणात शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी हजेरी लावल्यानं वेगळंच नाट्य रंगलंय.

हे प्रश्न पडण्याचं कारणदेखील तसं खास आहे. संसदेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ भाजपनं गुरूवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या उपोषण आंदोलनात शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी हजेरी लावली. दिल्लीतल्या करोलबागमध्ये आयोजित उपोषणात एकेकाळी शिवसेनेत असलेल्या आणि आता भाजपचे केंद्रीय वाणिज्यमंत्री असलेल्या सुरेश प्रभूंच्या मांडीला मांडी लावून गितेदेखील आंदोलनात सहभागी झाले. 

'मोर-लांडोरांची स्पर्धा...'

विशेष म्हणजे, भाजपच्या या उपोषणावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून टीकेचे बाण सोडण्यात आले होते. 'काँग्रेसचे उपोषणास्त्र फसल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं एक दिवसाचा उपवास करायचा ठरवला आहे. मोर आणि लांडोरांची ही अशी स्पर्धा सुरू आहे', अशा शब्दांत संपादक उद्धव ठाकरे यांनी सामनामधून तोफ डागली.

मोदींची आज्ञा...?

एकीकडं पक्षप्रमुख उपोषणाला विरोध करत असताना, शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते थेट भाजपच्या व्यासपीठावर उपोषणाला बसले. भाजपच्या खासदारांनी मोदींचे आदेश शिरसावंद्य मानणं स्वाभाविक आहे. पण शिवसेनेच्या मंत्र्यानं मोदींचा आदेश शिरसावंद्य मानणं पक्षातल्या अनेकांना खटकलं. 

उद्धव ठाकरेंचा गितेंना फोन... 

शिवसेनेच्या विरोधाला गितेंनी हरताळ फासल्याची वार्ता सध्या जपानच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या कानी घालण्यात आली. मग काय पक्षप्रमुखांनी थेट जपानहून गितेंना फोन केला. उपोषणाच्या मंचावरून तातडीनं पायउतार होण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी गितेंना दिले... बिच्चारे गिते... मोदी विरूद्ध ठाकरे अशा अडकित्त्यात सापडलेल्या गितेंनी मग हळूच काढता पाय घेतला... पण यामुळं भाजप-शिवसेनेतल्या संघर्षात आणखी एका अध्यायाची भर पडली. शिवाय शिवसेनेची राजकीय नाचक्की झाली, ती वेगळी...
 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x