काँग्रेस आमदारांचे राजीनामासत्र सुरूच

आतापर्यंत ८ आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का

Updated: Jun 5, 2020, 12:48 PM IST
काँग्रेस आमदारांचे राजीनामासत्र सुरूच title=

अहमदाबाद :  गुजरातमध्ये काँग्रेसला लागलेली गळती थांबायला तयार नाही. गेल्या दोन दिवसांत तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदारांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या आता ६५ वर आली आहे.

मोरबीचे काँग्रेस आमदार ब्रिजेश मेरजा यांनी राजीनामा दिला आहे. याआधी कर्जनचे आमदार अक्षय पटेल आणि कपराडाचे आमदार जीतू चौधरी यांनी राजीनामा दिला होता. तर याआधी मार्च महिन्यात काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ६८ पर्यंत खाली आली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ८१ जागा जिंकल्या होत्या.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. चार पैकी दोन जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा होता. पण काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्याने त्यांची संख्या ६५ पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे काँग्रेसला दुसरी जागा जिंकणे अवघड बनले आहे.

आमदारांच्या राजीनाम्याबाबत बोलताना एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, हे अपेक्षित होते. भाजप नेते अन्य राज्यांत असं करू शकतात, तर गुजरात हे त्यांचे घर आहे.

गुजरातचे काँग्रेस प्रभारी राजीव सातव म्हणाले, भारत स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आरोग्य, आर्थिक आणि मानवी संकटात आहे. असे असूनही भाजप आपली सगळी शक्ती आमदारांच्या घोडेबाजारावर लावत आहे. त्यामुळे गुजरातमधील जनतेचे नुकसान होऊ शकते.

 

दरम्यान, आमदारांचे राजीनामे काँग्रेससाठी मोठा धक्का असून भाजपला राज्यसभा निवडणुकीत फायदा होणार आहे.