नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॅशच्या कमतरतेबाबत अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्पष्टीकरण दिलेय. अर्थमंत्र्यांनी ट्विटरवरुन याबाबत स्पष्टीकरण दिलेय. जेटली ट्विटरवर म्हणाले, देशातील सध्या किती कॅश आहे याबाबत समीक्षा करण्यात आलीये. देशात पुरेल इतकी कॅश उपलब्ध आहे.
बँकामध्येही कॅश आहे. काही क्षेत्रात अचानक आणि असामान्य वृद्धि झाल्याने काही काळासाठी कॅशची कमतरता निर्माण झालीये. मात्र या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सुरु असलेल्या कॅशच्या कमतरतेबाबत केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी आश्वासन दिलेय की लवकरच या समस्येवर तोडगा निघणार आहे. केंद्र सरकार आणि आरबीआयने एक समिती नेमलीये. ही समिती यावर लवकरच तोडगा काढेल. येत्या दोन ते तीन दिवसांत या परिस्थितीवर तोडगा निघेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Have reviewed the currency situation in the country. Over all there is more than adequate currency in circulation and also available with the Banks. The temporary shortage caused by ‘sudden and unusual increase’ in some areas is being tackled quickly.
— Arun Jaitley (@arunjaitley) April 17, 2018
केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार, सध्या आरबीआयकडे 1,25,000 कोटी रुपये कॅश आहेत. मात्र ही समस्या काही ठिकाणच्या असमानतेमुळे निर्माण झालीये. काही राज्यांकडे पुरेसी कॅश उपलब्ध आहे तर काहींकडे कॅशचा तुटवडा आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्यानुसार समिती नेमल्यात. ज्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कॅश ट्रान्सफर होणार आहे.
गुजरात, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कॅशचा तुटवडा जाणवतोय. येथील एटीएममध्ये कॅश उपलब्ध नाहीये. एका बँक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तीन राज्यांमधील कॅशचा तुटवडा भरुन काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. या स्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी सर्व राज्य सरकार आरबीआयशी संपर्कात आहेत.