मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची प्रकृती बिघडली, कोरोना टेस्ट करणार

कोरोना टेस्ट केली जाणार

Updated: Jun 8, 2020, 12:59 PM IST
मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची प्रकृती बिघडली, कोरोना टेस्ट करणार title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना ताप आणि खोकला येत असल्याने त्यांची आता कोरोना टेस्ट होणार आहे. त्यांच्या सर्व नियोजीत बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी कोणाचीच भेट देखील घेतलेली नाही. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे.

कालच दिल्लीतील केजरीवाल सरकारने दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीतील लोकांना उपचारासाठी दाखल केलं जाईल असा निर्णय घेतला होता. फक्त केंद्राच्या रुग्णालयांमध्ये बाहेरच्या राज्यातील लोकांवर उपचार केले जातील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: याची घोषणा केली होती. दिल्ली सरकारला दिल्लीकरांनी आणि डॉक्टर महेश वर्मा कमेटीने हा सल्ला दिला होता.

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार 654 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात येथे 1320 रुग्ण वाढले आहेत. तर 761 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण 219 कंटेनमेंट झोन आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक जूननंतर रोज 1200 हून अधिक रुग्ण वाढत आहेत.

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 2 लाख 56 हजार 611 वर पोहोचला आहे. ज्यापैकी 7 हजार 135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 24 हजार 95 लोकं बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात 1 लाख 25 हजार 381 जण उपचार घेत आहेत.