नवी दिल्ली : दिल्लीच्या विजयानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीची चर्चा रंगत आहे. केजरीवाल हे तिसऱ्यांदा १४ फेब्रुवारीला शपथ घेण्याची परंपरा कायम ठेवणार का याकडे लक्ष लागले आहे. ते १४ रोजी शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आम आदमीचा दिल्लीत मोठा विजय झाला आहे. केजरीवाल नावाच्या एका साध्या माणसाने दिल्ली विजयाची हॅटट्रिक केलीय. हिरो ऑफ द डे- अर्थातच अरविंद केजरीवाल. साधेपणात काय ताकद असते, हे केजरीवालांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. नेहमी पँट आणि बुशशर्ट, फार तर एखादा मफलर, या चौकटीबाहेर केजरीवाल कधीच पडले नाहीत. २०१२मध्ये भ्रष्टाचाराचा सफाया करण्यासाठी केजरीवाल झाडू घेऊन मैदानात उतरले. आज ते दिल्लीचे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. विकासाचे मॉडेल म्हणून या निवडणुकीकडे पाहिले गेले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ने तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वात 'आप'ने तिसऱ्यांदा निर्विवाद सत्ता मिळवली आहे. केजरीवालांच्या आपनं ७० पैकी ६२ जागा मिळवल्या आहेत. तर भाजपला दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. तर काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा भोपळाही फोडला आला नाही. या निर्भेळ यशानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. दिल्लीने नव्या राजकारणाला जन्म दिल्याची प्रतिक्रिया केजरीलांनी विजयानंतर दिल्लीकरांशी साधलेल्या संवादात दिली.
दिल्लीकरांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल सरकारवर विश्वास दाखवलाय. विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय. आपच्या कार्यालयात फुलांनी सजावट करण्यात आलीय. रस्त्यारस्त्यावर आपचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसून येतायत. आप कार्यकर्त्यांकडून पेढे, लाडू वाटप करण्यात येतंय. चक्क एका फळविक्रेत्याने फुकटात संत्र्यांचं वाटप केलं. तर एक छोटा आप समर्थक तर थेट अरविंद केजरीवाल यांच्या वेशभूषेत दिसून आला. तर दिल्लीत एका फळविक्रेत्याने आपच्या विजयाचा आनंद संत्र्यांचं वाटप करून केला...यावेळी संत्री घेण्यासाठी लोकांची गर्दीही जमली...अरविंद केजरीवाल जनतेसाठी काम करतात त्यामुळे त्याचं यश निश्चित असल्याचं मला आधीपासूनच माहित होतं म्हणून हे संत्र्यांचं वाटप केल्याचं फळविक्रेत्याचं म्हणणे आहे.
दिल्ली पुन्हा एकदा जिंकल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मतदानाच्या आदल्या दिवशी ७ तारखेलाही ते मंदिरात गेले होते. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी 'नकली भक्त' असे म्हणून टीका केली होती. ५ वर्ष केजरीवाल मंदिरात गेले नाहीत. निवडणुकीपूर्वी त्यांना देवाची आठवण आल्याचे तिवारी म्हणाले होते. आता पुन्हा दिल्ली काबीज केल्यानंतर केजरीवाल हनुमंताला शरण गेलेत.