तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट; पत्नीचा भाजपावर गंभीर आरोप, 'त्यांच्या जेवणात...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपा अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट आखत असल्याचा आरोप सुनिता केजरीवाल यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 21, 2024, 05:20 PM IST
तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट; पत्नीचा भाजपावर गंभीर आरोप, 'त्यांच्या जेवणात...' title=

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांनी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपा तिहार जेलमध्येच अरविंद केजरीवाल यांची हत्या करण्याचा कट आखत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच अरविंद केजरीवाल यांना खाण्यात दिल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थावर प्रशासन लक्ष ठेवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

"अरविंद केजरीवाल यांच्या अन्नात कॅमेरे बसवले आहेत. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक घासावर लक्ष ठेवलं जात आहे. हे फार लाजिरवाणं आहे. ते शुगर पेशंट असून गेल्या 12 वर्षांपासून इंसुलिन घेत आहेत. पण जेलमध्ये त्यांना इंसुलिन नाकारली जात आहे. त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची हत्या करायची आहे," असा आरोप सुनिता केजरीवाल यांनी केला आहे. त्या इंडिया आघाडीच्या रॅलीत बोलत होत्या. 

पुढे बोलताना सुनिता केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दोषी सिद्ध न करता तुरुंगात टाकल्याबद्दल विद्यमान सरकारला 'हुकूमशाही' म्हटलं. "त्यांनी अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना जेलमध्ये टाकलं आहे. त्यांना दोषी सिद्ध न करताच जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. ही हुकूमशाही आहे. माझ्या पतीचा काय दोष आहे? चांगला शिक्षण, आरोग्य सुविधा देणं ही चूक आहे का?," अशी विचारणा सुनिता केजरीवाल यांनी केली आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांसाठी आपला जीव पणाला लावला आहे, असंही त्या म्हणाल्या. "ते एक IITan आहेत. तो परदेशात जाऊ शकले असते, पण ते देशभक्तीला प्राधान्य देताता. IRS असतानाही सार्वजनिक सेवा करण्यासाठी त्यांनी रजा घेतली. त्यांनी लोकांसाठी आपला जीव पणाला लावला," असं त्या म्हणाल्या आहेत.