नवी दिल्ली : 'ट्रिपल तलाक' पद्धतीवर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ऎतिहासिक निर्णय दिला. कोर्टाच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मुस्लिमांच्या तीन तलाक पद्धतीला कोर्टाने असंवैधानिक म्हटले आहे.
मुस्लिम समाजातील महिलांसाठी अन्यायकारक असलेली ही प्रथा घटनाबाह्य ठरवत न्यायालयानं केंद्र सरकारला याबाबत कायदा करण्याचे आदेश दिले आहेत. कायदा होईपर्यंत ही प्रथा बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
एमआयएमचे मुख्य असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ‘आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी एक मोठं काम असेल’.
We have to respect the judgement. It is going to be a great Herculean task to implement this on ground: Asaduddin Owaisi, AIMIM #TripleTalaq pic.twitter.com/FbWPKmgPwG
— ANI (@ANI) August 22, 2017
ऑल इंडिया मुस्लिम वुमेन पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने ट्रिपल तलाक प्रथेवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर इस्लाम आणि देशातील मुस्लिम महिलांचा विजय मानत यातून मुस्लिम महिलांवर होत असलेले अत्याचार थांबतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तर ऑल इंडिया मुस्लिम वुमेन पर्सनल लॉ बोर्डच्या अध्यक्षा शाइस्ता अंबर म्हणाल्या की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय मुस्लिम समाजासाठी ऎतिहासिक आहे. हा देशातील मुस्लिम महिलांचा विजय आहे. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे हा इस्लामचा विजय आहे. आशा आहे की, येत्या काळात ट्रिपल तलाक पद्धत पूर्णपणे संपुष्टात येईल.