मुंबई - पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने नाहीत. पण याचा संबंध २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीशी जोडू नये, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, आमदार आशिष शेलार यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर बुधवारी एका कार्यक्रमात त्यांनी वरील मत मांडले.
गेल्या आठवड्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या पाचही राज्यात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेतून पायउतार झाला असून, या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा म्हणाले, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील निकाल निश्चितच आमच्या बाजूने नाहीत. पण या निकालांना आगामी लोकसभा निवडणुकीशी जोडणे योग्य नाही. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवल्या जातात. त्यामुळे दोन्हींचे निकाल एकमेकांशी जोडणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. पण आता या दोन्ही राज्यांत त्यांना सत्ता गमवावी लागली आहे. मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे काँग्रेसला बळ मिळाले आहे. गेल्या चार वर्षांपासून विविध निवडणुकीत सातत्याने पराभव पत्कराव्या लागलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास यामुळे दुणावला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील जनतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. आम्ही निकालांचे नक्कीच विश्लेषण करू. पण आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यात आणि देशाच्या इतरही राज्यांत भाजपचा विजय होणे देशासाठी हितकारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपविरोधात महाआघाडी तयार करण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे केवळ मृगजळ असल्याची टीकाही अमित शहा यांनी यावेळी केली.