मोदी-शहांची जोडी पुन्हा सत्तेत आली तर देशात पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत- केजरीवाल

जर्मनीत हिटलरने जे केले त्याची पुनरावृत्ती भारतात होईल

Updated: Jan 20, 2019, 07:58 AM IST
मोदी-शहांची जोडी पुन्हा सत्तेत आली तर देशात पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत- केजरीवाल title=

कोलकाता: देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखणे गरजेचे आहे. कारण, मोदी-शहांची जोडी पुन्हा सत्तेत आली तर ते देशाचे संविधान बदलतील आणि पुन्हा कधीही निवडणुका होऊन देणार नाहीत, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. ते शनिवारी कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या विरोधकांच्या महासभेत बोलत होते. या सभेला देशभरातील जवळपास २० पक्षांचे एकूण २५ प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये एक माजी पंतप्रधान, ४ विद्यमान मुख्यमंत्री, ६ माजी मुख्यमंत्री आणि डझनभर माजी केंद्रीय मंत्री उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांची महाआघाडी प्रत्यक्षात येण्याच्यादृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी-शहा जोडगोळीवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, केंद्रातील धोकादायक भाजप सरकारचा कोणत्याही परिस्थितीत पराभव होणे गरजेचे आहे. भारत हा एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे. देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदी सरकारला सत्तेवरून हटवणे गरजेचे आहे. जर २०१९ च्या निवडणुकीत मोदी-शाह यांची जोडी पुन्हा निवडून आली तर ते या देशाचे संविधान बदलतील आणि देशात पुन्हा कधीच निवडणुका होणार नाहीत. जर्मनीत हिटलरने जे केले त्याची पुनरावृत्ती भारतात होईल, अशी भीती अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. 

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर सारे विरोधक प्रथमच एकत्र आले होते. त्यामुळे ही जाहीर सभा २२ विरोधी पक्षांच्या ऐक्याचे दर्शनच होते. परेड ग्राउंडवर ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने झालेल्या सभेला सुमारे ८ लाख लोक हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, भाजपचे खा. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह वाजपेयी सरकारधील अरुण शौरी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांनीही मोदी सरकारवर सडकून टीका केली.