नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मोठे बदल करण्यात आले आहेत. दरवर्षी तिरंग्याचा रंग असलेले कपडे परिधान करुन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणारी लहान मुले यंदा दिसणार नाहीत. तसेच लाल किल्ल्याच्या परिसरात बंदोबस्तावर असणारे सर्व पोलीस पीपीई किट परिधान करणार असल्याचे समजते. याशिवाय, दुपारी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमातही नेहमीच्या निमंत्रितांपेक्षा 'कोरोना वॉरियर्स'ला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.
एरवी लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचा सोहळा दिमाखात पार पडतो. या कार्यक्रमाला ९०० ते १००० लोकांना निमंत्रित केले जाते. मात्र, यंदा पंतप्रधान फारतर २५० लोकांसमोर देशाला उद्देशून भाषण करतील. सध्या संरक्षण मंत्रालयाकडून या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेता यंदा शाळेतील लहान मुलांना यंदा या सोहळ्यात प्रवेश नसेल. केवळ राष्ट्रीय छात्र दलाचे NCC विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित असतील. तर उर्वरित सर्व कर्मचारी पीपीई किट परिधान करुन असतील. याशिवाय, लाल किल्ल्याच्या परिसरात अनेक ठिकाणी सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे.
याशिवाय, या सोहळ्यासाठी येणाऱ्या निमंत्रितांसाठी फिजिकल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन खास आसनव्यवस्था करण्यात येईल. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव १ ऑगस्टपासून सामान्य नागरिकांना लाल किल्ल्याच्या परिसरात प्रवेश नसेल. एरवी स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसाठी ७ ऑगस्टपासून लाल किल्ल्यावर प्रवेशबंदी केली जाते.
मात्र, यंदा या सोहळ्यासाठी काम करणाऱ्या कामगारांची संख्या कमी आहे. दरवर्षी साधारण २००० कामगार या सोहळ्याच्या तयारीसाठी झटत असतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे दिल्लीतील बहुतांश कामगार गावी परतले आहेत. यापैकी काहीजणांना जास्त पैसे देऊन काम करण्यासाठी बोलावून घेण्यात आले आहे. परंतु, कामगारांची संख्या ही निम्म्याने कमी आहे. त्यामुळे तयारीसाठी जास्त वेळ लागत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.