नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. एम्स रुग्णालयानं वाजपेयींच्या प्रकृतीचं मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केलं आहे. मागच्या ९ आठवड्यांपासून वाजपेयी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल आहेत. मागच्या २४ तासांमध्ये त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाली आहे. वाजपेयींना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती एम्सनं दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. वाजपेयींवर ११ जूनपासून एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ९४ वर्षांच्या अटलबिहारी वाजपेयींना मूत्रमार्गामध्ये संसर्ग झाल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या काही वर्षांपासून वाजपेयी हे डिमेंशियानं आजारी आहेत. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतली होती.