नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना हिमाचल प्रदेशातील मनाली हे शहर अत्यंत प्रिय होते. येथील प्रेनी या गावातील लोकांना वाजपेयी अजूनही स्मरणात आहेत. वाजपेयींच्याच प्रयत्नामुळे या गावात प्राथमिक ते माध्यमिक इयत्तेपर्यंतची शाळा सुरु झाली. एवढेच नव्हे तर वाजपेयींनी शाळेतील विद्यार्थ्यांना अगदी पुस्तकांपासून सर्व सोयी पुरवल्या.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक विद्यार्थी आजही वाजपेयींच्या काळात देण्यात आलेली पुस्तके वापरत आहेत. याशिवाय, वाजपेयांनी शाळेसाठी दिलेले संगणक येथील विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. या शाळेसोबत वाजपेयींची आणखी एक खास आठवण जोडली गेली आहे.
५ जून २००६ रोजी या शाळेची स्थापना झाली तेव्हा वाजपेयींनी येथे देवदाराचा वृक्ष लावला होता. तेव्हा वाजपेयींनी गावकऱ्यांकडून या वृक्षाची देखभाल कराल, असे वचनही घेतले होते. गावकऱ्यांनी हे वचन पाळले असून आजही या वृक्षाची देखभाल केली जाते.