हनुमान जयंतीच्या यात्रेवर हल्ला, दिल्ली पोलिसांसह अनेक जण जखमी

हनुमान जयंतीच्या यात्रेवर दगडफेक झाल्याची घटना दिल्ली घडली आहे. पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत.

Updated: Apr 16, 2022, 08:29 PM IST
हनुमान जयंतीच्या यात्रेवर हल्ला, दिल्ली पोलिसांसह अनेक जण जखमी title=

नवी दिल्ली : दिल्लीत हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक झाल्याची माहिती पुढे येत आहे. शोभायात्रेवर झालेल्या या हल्ल्यात अनेक लोकांसह अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती येत आहे. अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. जहांगीरपुरी या ठिकाणी ही घटना घडली आहे.

हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जात असताना हा हिंसाचार सुरू झाला आणि बघता बघता अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. किरकोळ कारणावरून दोन गटात झालेली हाणामारी मोठ्या वादाचे कारण बनली.

पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. यासोबतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरही पोलिस लक्ष ठेवून आहेत. हा पूर्वनियोजित कट आहे का, अचानक अशी घटना का घडली याबाबत पोलिसांची चौकशी सुरु आहे. गृहमंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोबतच अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.

सध्या येथे तणावाचे वातावरण असून, जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. मिरवणुकीवर दगडफेक केल्याचेही सांगण्यात आले. यावेळी पोलिसांकडून या घटनेवर काहीही बोलण्याचे टाळले जात आहे.