Bangladesh Violence: हिंसाचार उफाळलेल्या बांगलादेशातील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून सुरु झालेल्या या हिंसाचारात आता संपूर्ण देश जळत आहे. देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून, अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. यादरम्यान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या 20 नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत.
पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात दाखल झालेल्या हसीना शेख यांच्या आवामी लीग पक्षाच्या नेत्यांना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. आवामी लीगच्या 20 नेत्यांचे मृतदेह आढळले आहेत. या नेत्यांच्या कुटुंबीयांचेही मृतदेह सापडले आहेत. पक्षाच्या अनेक नेते, कार्यकर्ते तसंच संस्थांमध्ये तोडफोड आणि लूट सुरु आहे.
बांगलादेशच्या सतखिरामध्ये झालेल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. कुमिलामध्ये 11 लोक मारले गेले असून बांगलादेशचे माजी काऊन्सिलर मोहम्मद शाह आलम यांचं तीनमजली घर दंगलखोरांनी पेटवलं. यामध्ये 6 जण ठार झाले.
बांगलादेशमधील प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचं ढाकाच्या धानमंडी येथे असणारं 140 वर्षं जुनं घर पेटवण्यात आलं आहे. घराला आग लावण्याआधी तेथील सामान लुटण्यात आलं.
सत्तापालट झाल्यानंतर आणि शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पळ काढल्यानंतर त्यांच्या माजी कॅबिनेट मंत्र्य़ांना फटका बसू लागला आहे. बांगलादेशचे माजी परराष्ट्र मंत्री हसन महमूद यांना ढाका विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. ते भारतात विमानाने येण्यासाठी निघाले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
बांगलादेशात सत्तापालट होण्यापूर्वीच शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षातील अनेक प्रमुख नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री देश सोडून गेले होते. आवामी लीगचे सरचिटणीस आणि रस्ते वाहतूक मंत्री अब्दुल कादेर रविवारी रात्रीच देश सोडून पळून गेले होते. यासोबतच हसीनांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले अनिसुल हक हे हसीनाच्या राजीनाम्यापूर्वीच देश सोडून अज्ञातस्थळी गेले होते.
बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. यादरम्यान 27 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले झाल्याची माहिती आहे. मोठ्या प्रमाणात हिंदू मंदिरांना लक्ष्य केलं जात आहे.
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर अनेक पोलिस स्टेशन आणि इमारती लुटल्या आहेत. ढाक्याचे मीरपूर मॉडेल पोलीस स्टेशनही पेटवून देण्यात आलं. यामुळे पोलीस ठाणे जळून खाक झालं. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, अनेक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मीरपूर पोलिस स्टेशन गाठले आणि स्टेशनचा जळालेला भाग स्वच्छ केला.
बांगलादेश पोलीस सेवा संघटनेने (BPSA) मंगळवारी संपाची घोषणा केली होती. प्रत्येक पोलिसाच्या सुरक्षेची खात्री होईपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बांगलादेशात सोमवारी 400 हून अधिक पोलिस ठाण्यांवर हल्ले झाले. या काळात अनेक पोलीस मारले गेले.
बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामीने मान्य केलं आहे की, बांगलादेशात शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. हिंदू मंदिंरानाही लक्ष्य केलं जात असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.
शेख हसीना यांनी नियुक्त केलेले बांगलादेशचे पोलीस महानिरीक्षक (IGP) चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना मंगळवारी रात्री उशिरा बडतर्फ करण्यात आले. द डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, सार्वजनिक प्रशासन मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले की वाहतूक आणि ड्रायव्हिंग स्कूल कमांडंट मोहम्मद मैनुल इस्लाम हे नवीन महानिरीक्षक असतील. बडतर्फ केलेले आयजीपी अल-मामून करारावर होते. त्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून मागील सरकारने त्यांना सेवेत मुदतवाढ दिली होती.
खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान आज बांगलादेशला परतत आहे. सायंकाळी ते ढाका येथील रॅलीत सहभागी होतील. तारिक अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. पण आता शेख हसीना पलायन केल्यानंतर ते आपल्या देशात परतत आहेत.
ढाकाहून एअर इंडियाचे विमान दिल्लीला पोहोचले. विमानातून उतरलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, 'आता (बांगलादेशात) परिस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. उद्यापासून कारखाने, कार्यालये, बँका, महाविद्यालये, शाळा सुरू होतील. मी येथे माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो आहे. अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याच्या वृत्तावर ते म्हणाले की, असे नाही, तिथे सर्व काही ठीक आहे. त्याचवेळी दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, तो उपचारासाठी भारतात आला आहे.