कोरोनावर गुणकारी औषध शोधणाऱ्या 'पतंजली आयुर्वेदीक'ला आयुष मंत्रालयाची नोटीस

पतंजलीने ताबडतोब या औषधाच्या जाहिराती थांबवाव्यात....   

Updated: Jun 24, 2020, 06:30 AM IST
कोरोनावर गुणकारी औषध शोधणाऱ्या 'पतंजली आयुर्वेदीक'ला आयुष मंत्रालयाची नोटीस  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : coronavirus जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर गुणकारी औषध शोधल्याचा दावा करणाऱ्या योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडकडून करण्यात आला. या औषधाचं मंगळवारी अनावरणही करण्यात आलं. ज्यानंतर केंद्राकडून Patanjali Ayurved Limited  पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडला नोटीस बजावण्यात आली असून, या औषधाचा तपशील आणि त्याच्या वैद्यकिय चाचणीचे, निकालाचे अहवाल सादर करण्याची विचारणा करण्यात आली आहे. 

आयुष मंत्रालयानं उत्तराखंड, हरिद्वारस्थित पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडच्या नावे एक पत्रक जारी केलं. बातम्यांमध्ये या औषधाबाबतची माहिती मिळताच मंत्रालयानं ही पावलं उचललल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये मंत्रालयानं औषधाची सर्व माहिती, त्याचा अभ्यास, वैद्यकिय तपशील अशी सर्व माहिती मागवली आहे. 

नेमकी मंत्रालयानं कशाची मागणी केली आहे? 

कोरोना व्हायरस किंवा कोविड १९ वर गुणकारी उपाय म्हणून दावा करणाऱ्या पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडच्या ‘Coronil and Swasari’ या औषधाच्या नावापासून त्याच्या मात्रेपर्यंतची माहिती. 

कोणत्या रुग्णालयांमध्ये अथवा कोणत्या ठिकाणी या औषधाची चाचणी झाली त्या ठिकाणांची नावं. त्यासाठी पाळला गेलेला शिष्टाचार. 

औषधाच्या चाचणी मात्रेचा नमुना, संस्थात्मक परवनानगीचा तपशील, भारतीय वैद्यकिय चाचणी नोंदणी क्रमांक

औषधाच्या चाचणीच्या निष्कर्षाचा अहवाल, याची मागणी आयुष मंत्रालयानं केली आहे. सोबतच या औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेशही मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. शिवाय या औषधाच्या निर्मितीसाठी उत्तराखंड सरकारनं दिलेल्या राज्यस्तरीय परवान्याची प्रतही मागवण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान, 'द हिंदू'च्या वृत्तानुसार या औषधाच्या चाचणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांनी अद्यापही औषधाचे कोणतेही निष्कर्ष प्रसिद्ध केलेले नाहीत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १०० कोरोनाबाधित रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली होती. ज्यांपैकी ५० जणांना औषधाची मात्रा देण्यात आली होती. तर, ५ जणांनी मध्येच माघार घेतली होती. उर्वरित रुग्णांचंही चाचणीसाठी योगदान होतं. 

 

एकंदरच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणारं आरोग्य खातं आणि त्यासाठी विविध उपाय राबवणारं प्रशासन यांची एकंदर धावपळ पाहता आता बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडच्या माध्यमातून दावा केल्या जाणाऱ्या या औषधावर अनेकांच्याच नजरा आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.