नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभा उपाध्यक्ष रमा देवी यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य करणारे सपा नेते आझम खान यांची त्यांच्या पत्नीकडून पाठराखण करण्यात आली आहे.
आझम खान यांची पत्नी तंजीमा फातिमा यांनी 'झी न्यूज'शी संवाद साधताना म्हटले की, आझम काहीही चुकीचे बोलले नाहीत, ते माफी मागणार नाहीत. आझम खान यांनी रमा देवी असल्याचे म्हटले होते. त्यांनी सभागृहात कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. त्यामुळे त्यांनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तंजीमा फातिमा यांनी सांगितले.
तसेच तंजीमा फातिमा यांनी या सगळ्यासाठी भाजपला जबाबदार धरले. भाजपला सभागृहात आझम खान यांना बोलू द्यायचे नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी सतत वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप फातिमा यांनी केला.
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना हा प्रकार घडला होता. यावेळी लोकसभेच्या उपाध्यक्ष रमा देवी सभागृहाचा कारभार सांभाळत होत्या.
तेव्हा आझम खान यांनी रमा देवी यांना उद्देशून म्हटले की, तुम्ही मला इतक्या चांगल्या वाटता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघतच राहावेसे वाटते. मला मुभा मिळाली तर मी कधी तुमच्यावरून नजर हटवणारच नाही, असे आझम खान यांनी म्हटले होते. यानंतर सभागृहात गदारोळ उडाला होता.
तर दुसरीकडे रमा देवी यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भेट घेऊन आझम खान यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यासाठी सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी आझम खान यांनी सोमवारी सभागृहात माफी मागावी, असा निर्णय झाला. त्यामुळे आझम खान काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.