इंदोर : मध्य प्रदेशमधील ( Madhya pradesh ) अलीराजपूर येथील नानपूर गाव. या गावच्या माजी सरपंचाचा लग्न सोहळा पार पडला. लग्नासाठी एक मंडप उभारण्यात आला होता. नवरोबा नटून थटून सज्ज होते. मंत्राचे पठण सुरु होते. नवरीला बोहल्यावर आणा असं पुरोहितांनी सांगितलं आणि...
नानपूर गावाचे माजी सरपंच समरथ मौर्य यांची आर्थिक स्थिती हलाखीची त्यामुळे त्यांना लग्न करता आलं नाही. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी लग्न केले नाही तरी त्यांचे नानबाई या युवतीसोबत प्रेमाचे सूत जुळले. मग त्यांनी तिच्यासोबत लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गेली १५ वर्ष ते लिव-इनमध्ये होते.
नानबाई नंतर त्यांचे आणखी मेलाबाई आणि सकरीबाई या दोघींशी प्रेम जुळले. त्यांच्याशीही ते लिव-इनमध्ये रहात होते. समरथ यांचे वय 35 वर्ष आहे तर नानबाई 33 वयाची आहे. तिला 3 मुली आणि 1 मुलगा अशी चार मुले आहेत. दुसरी प्रेमिका मेलाबाई 29 वर्षाची असून तिला एक मुलगा आहे. तर तिसरी प्रेमिका 28 वर्षाची सकरीबाई हिलाही एक मुलगा झाला आहे.
या तीनही महिलांसोबत त्यांना वेगवेगळ्या वेळी प्रेम झाले. एकूण सहा मुले झाली. त्यांचे पालनपोषण समरथ करत होते. मात्र, आता समरथ यांची परिस्थिती सुधारली. त्यामुळे त्यांनी तिन्ही प्रेमिकांशी लग्न करून त्यांच्या मुलांना आपले नाव देण्याचा निर्णय घेतला.
समरथ यांनी लग्न पत्रिकेत तिन्ही प्रेमिकांची नावे वधू म्हणून प्रसिद्ध केली आणि या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली. नानपूर गावात हा आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने गावकऱ्यांची उपस्थिती होतीच. पण, समरथ याची तिन्ही मुले यजमान म्हणून मिरवत होती.
आदिवासी भिल्ल समाजात लिव इनमध्ये राहणे, मुलांना जन्म देण्याची सूट आहे. परंतु, लग्न न करता परिवारातील कोणत्याही सदस्याला शुभ कार्यात सहभागी होता येत नाही. त्यामुळे तिन्ही प्रेमिकांशी विवाह केल्याचे समरथ सांगतात.