गोव्यात आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठ प्रकरणी जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे होत आहेत. चौकशीत सूचना सेठने पोलिसांकडे अनेक खुलासे केले आहेत, जे ऐकून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पती वेंकटरमन आपल्या मुलाला भेटू नये यासाठी तिने गोव्याला जाण्याची योजना आखली होती. तसंच आपला मुलगा विभक्त झालेल्या पतीसारखा दिसत असून सारखी त्याची आठवण करुन देत असल्याचं सूचना मित्र आणि कुटुंबीयांना सांगायची.
मुलाचे वडील वेंकटरामन यांनी शनिवारी सूचनाला फोन केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांनी रविवारी मुलासोबत वेळ घालवण्यासाठी त्याला रविवारी बंगळुरुच्या राजाजीनगर येथील घऱी आणण्यास सांगितलं होतं. पण सूचनाने पतीच्या घऱी जाण्यास नकार दिला होता. तिने वेकंटरामनला सदाशिवनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी भेटण्यास सांगितलं होतं.
वेंकटरामन सकाळी 11 वाजता पोहोचला होता. त्याने 2 तास सदाशिवनगरमध्ये वाटही पाहिली. त्याने फोन, मेसेज आणि ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही उत्तर मिळालं नाही. नंतर कामाच्या निमित्ताने तो इंडोनेशियाला निघून गेला होता.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आखला होता कट
सूचना सेठने आपल्या मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कट आखला होता. पण तिला यश मिळालं नाही आणि पोलिसांच्या हाती लागली. सूचना गोव्यावरुन बंगळुरुला जात असताना रस्त्यात वाहतूक कोंडी झाल्याने 4 तास अडकली होती. यादरम्यान पोलिसांनी कॅब चालकाला फोन केला आणि त्याला सूचनाला कळू न देता जवळचं पोलीस स्टेशन गाठण्यास सांगितलं. कॅब पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर सूचनालाही धक्का बसला. यानंतर तिला काही समजण्याआधी पोलिसांनी तिला अटक केलीहोती. तिच्या बॅगेची तपासणी करण्यात आली असता त्यात मुलाचा मृतदेह होता.
जर वाहतूक कोंडीत अडकली नसतील तर कदाचित सूचना बंगळुरुत पोहोचली असती आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात यशस्वी झाली असती. दरम्यान ज्या दिवशी सूचना गोव्यातील हॉटेल रुममध्ये मुलाची हत्या केली त्यादिवशी वेंकटराममने तिला व्हिडीओ कॉल केला होता. त्याला आपल्या मुलाशी बोलायचं होतं. सूचनाने त्याला तू मुलाला भेटू शकतोस असं सांगितलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी गळा दाबून तिने मुलाला ठार केले.
सूचना आणि वेंकटरामन यांचा 2010 मध्ये प्रेमविवाह झाला होता. 2019 मध्ये त्यांना मुलगा झाला. 2020 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. प्रकरण कोर्टात गेलं असता आईला मुलाचा ताबा मिळाला. पण ती वेंकटरामनला मुलाला भेटू देत नव्हती. यामुळे त्याने कोर्टात धाव घेतली असता दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. यावरुनच सूचना सेठ नाराज होती. तिला कोणत्याही परिस्थितीत दोघांची भेट होऊ द्यायची नव्हती. हत्या करण्यात आलेल्या कारणांमध्ये हेदेखील आहे.