बँक कर्मचारी ३०, ३१ मे रोजी संपावर

 राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. 

Updated: May 24, 2018, 10:25 PM IST
बँक कर्मचारी ३०, ३१ मे रोजी संपावर title=

मुंबई : राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. भारतीय बँक संघाने कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला, याविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. पगार वाढीसाठी ५ मे २०१८ रोजी बैठक झाली, बैठकीत बँक संघाने २ टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला. तसेच अधिकाऱ्यांच्या मागणीवरून केवळ स्केल ३ च्या अधिकाऱ्यांपर्यंत ही वाढ मर्यादीत असेल. 

मागील २ ते ३ वर्षांत प्रचंड काम

युनायटेड फोरम आणि बँक युनियन्सचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटलंय की, एनपीएमुळे बँकांचं जे नुकसान झालं आहे, त्यात कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही. बँक कर्मचाऱ्यांना मागील २ ते ३ वर्षापासून जनधन योजना, नोटबंदी, मुद्रा आणि अटल पेन्शन योजना या केंद्राच्या प्रमुख योजनांमुळे रात्रंदिवस काम करावं लागलं. या योजनांच्या कामाचा बोझा निश्चितच बँक कर्मचाऱ्यांवर पडला आहे, असं तुळजापूरकर यांनी म्हटलं आहे.

१५ टक्के वाढ करण्यात आली होती

बँक कर्मचाऱ्यांना मागील पगार वाढीत १५ टक्के वाढ करण्यात आली होती, ही पगार समिक्षा १ नोव्हेंबर २०१२ ते ३१ ऑक्टोबर २०१७ साठी होती. यूएफबी ९ श्रमिक संघटनेची कार्यकारिणी आहे. यात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लाईज असोसिएशन, तसेच नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स सामिल आहे.

या आधी एआयबीईएने ११ मे आणि ३० आणि ३१ मे रोजी संपावर जाण्याबद्दल सांगितलं होतं, बँक कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप ३० मे रोजी सकाळी ६ पासून सुरू होईल. १ जून सकाळी ६ पर्यंत हा संप असेल.