आधी सनी लिओनी टॉपर, आता 'या' अभिनेत्रीला केलं STETत पास, बिहार बोर्डाचा पराक्रम

तक्रारीनंतरही बिहार शालेय परीक्षा मंडळाने केलं दुर्लक्ष

Updated: Jun 24, 2021, 09:41 PM IST
आधी सनी लिओनी टॉपर, आता 'या' अभिनेत्रीला केलं STETत पास, बिहार बोर्डाचा पराक्रम title=

नवी दिल्ली :  बिहार  शालेय परीक्षा मंडळ सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल झालं आहे. याचं कारणही तसंच आहे. सोशल मीडियावर एक गुणपत्रिका व्हायरल झाली आहे. या गुणपत्रिकेत नाव पुरुष उमेदवाराचं आहे पण फोटो एका महिलाचा आहे. विशेष म्हणजे ही महिला काही साधारण नाही, तर ज्या महिलेचा फोटो गुणपत्रिकेवर लावण्यात आला आहे, ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन. 

सनी लिओनीला केलं होतं टॉपर
या अक्षम्य चुकीमुळे बिहार शालेय परीक्षा मंडळावर सोशल मीडियामध्ये टीका होऊ लागली आहे. पण हे काही पहिलं प्रकरण नाही. याआधी बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीला बिहारच्या कनिष्ठ अभियांत्रिकी परिक्षेत टॉपर दाखवण्यात आलं होतं. 

नेमकं काय आहे प्रकरण
बिहार शालेय परीक्षा मंडळाने शिक्षक भर्ती करण्यासाठी राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (STET) 2019 च्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात जहानाबाद इथले उमेदवार ऋषिकेश कुमार यांचंही नाव होतं. पण काही कारणांने ऋषिकेश कुमार यांना इतर काही उमेदवारांबरोबर गुणवत्ता यादीतून बाद करण्यात आलं.

तक्रारीनंतरही परीक्षा मंडळाकडून सुधारणा नाही
ऋषिकेश कुमार यांनी गुणवत्ता यादी तयार करणाऱ्या मंडळाच्या निकषांवर प्रश्न उपस्थित केले. पण, हा एकच मुद्दा नव्हता. तर जारी करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत ऋषीकेश कुमार यांच्या नावासमोर चक्क दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिचा फोटो लावण्यात आला होता. ऋषिकेश कुमार ही चुक दुरुस्त करण्याबाबत परीक्षा मंडळाकडे तक्रारही केली होती. पण अजूनही परीक्षा मंडळाकडून कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही.

तेजस्वी यादव यांनी केली टीका

याप्रकरणी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी नितिश कुमार यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. नितिश कुमार सरकार करोडो युवकांचं आयुष्य उद्धव्स्त करत आहे, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे.