भक्तांना हात लावाल तर खबरदार! अमित शहांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात थोपटले दंड

केरळमधील डाव्यांचे सरकार अय्यप्पा भक्तांचे आंदोलन जबरदस्तीने दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

Updated: Oct 28, 2018, 09:07 AM IST
भक्तांना हात लावाल तर खबरदार! अमित शहांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात थोपटले दंड title=

तिरुअनंतपुरम: शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केरळमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी केलेल्या एका विधानामुळे या असंतोषाला खतपाणी घातले जाण्याची शक्यता आहे. ते शिवारी कन्नूर येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी अमित शहा यांनी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या भक्तांचे जाहीरपणे समर्थन केले. 

भाजप या भक्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध म्हणून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्या भक्तांनाही हात लावला तर भाजप पिनराई विजयन सरकारला उद्ध्वस्त करेल, असा इशारा यावेळी अमित शहांनी दिला. 

केरळमधील डाव्यांचे सरकार अय्यप्पा भक्तांचे आंदोलन जबरदस्तीने दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदूंच्या परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याची मोठी किंमत केरळ सरकारला चुकवावी लागेल, असे अमित शहांनी म्हटले. 

राज्य सरकार पोलीस दलाचा वापर करून भक्तांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने RSS तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांसह सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या विरोधामुळे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे सरकार आगीशी खेळ खेळत आहेत. परंतु, भाजप अय्यप्पा भक्तांच्या पाठिशी आहे. न्यायालयाचा निर्णय लागू करणे अशक्य असल्याचे अमित शहांनी सांगितले.