close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आमच्या सरकारने दहशतवाद फक्त अडीच जिल्ह्यांपुरता सीमित ठेवला- मोदी

गेल्या पाच वर्षांमध्ये देशाच्या अन्य भागांमध्ये बॉम्बस्फोट झालेले नाहीत.

Updated: Apr 18, 2019, 04:08 PM IST
आमच्या सरकारने दहशतवाद फक्त अडीच जिल्ह्यांपुरता सीमित ठेवला- मोदी

अहमदाबाद: गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने दहशतवाद हा देशातील अडीच जिल्ह्यांपुरता सिमीत ठेवला. या काळात देशाच्या अन्य भागात बॉम्बस्फोट झाले नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते गुरुवारी गुजरातच्या अमरोली येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या दहशतवादविरोधातील यशस्वी लढ्याचा पाढा वाचताना म्हटले की, गेल्या पाच वर्षांमध्ये देशाच्या अन्य भागांमध्ये बॉम्बस्फोट झालेले नाहीत. आम्ही जम्मू-काश्मीरच्या अडीच जिल्ह्यांपर्यंत दहशतवाद सिमीत ठेवण्यात यश मिळवले, असा दावा मोदींनी केला. तसेच गुजरातचा मुख्यमंत्री असताना ज्या गोष्टी शिकलो त्याचा फायदा डोकलाम प्रश्न हाताळताना झाला, असेही मोदी यांनी सांगितले. 

यावेळी त्यांनी बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या बदललेल्या भूमिकेसंदर्भातही भाष्य केले. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताशी संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले, असे इम्रान खान यांनी म्हटले होते. याचा दाखल देताना मोदींनी म्हटले की, भारताने फोन उचलावा यासाठी पाकिस्तानला जाहीररित्या विनंती करावी लागली, असे सांगत मोदींनी केंद्र सरकारचे यश अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तसेच गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभारण्यामागे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले. गुजरातमधील सरदार सरोवर योजना ४० वर्षांपूर्वीच पूर्ण झाली असती तर आज राज्यात चांगली परिस्थिती असती, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार करता २०१४ मध्ये काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या. यानंतर आता २०१९ मध्येही काँग्रेस सर्वाधिक कमी जागा लढवत आहे. मात्र, तरीही काँग्रेस सत्ता मिळवायची स्वप्ने बघत आहे, असा टोलाही मोदींनी लगावला.