नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. देशातील सत्ताधारी भाजपनेही पक्षाच्या प्रचारासाठी सर्व मार्ग अवलंबण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच आता देशातील पाच कोटी नागरिकांच्या घरांवर पक्षाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या विशेष प्रचार मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी अहमदाबादमध्ये झाला. यावेळी पहिल्यांदाच 'मेरा परिवार, भाजपा परिवार' या घोषणेचा वापरही सुरू करण्यात आला.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 'हर हर मोदी, घर घर मोदी' अशा आशयाची घोषणा तयार केली होती. पण यावेळी निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणेतून मोदी यांच्या नावाला वगळण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावेळी 'मेरा परिवार, भाजपा परिवार' या घोषणेने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये त्यांच्या घरावर पक्षाचा झेंडा फडकावून आणि पक्षाचे स्टिकर दाराला लावून या विशेष प्रचार मोहिमेची सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अमित शहा यांनी दिनदयाळ उपाध्याय प्रेक्षागृहात उपस्थितांशी संवादही साधला.
Shri Amit Shah launches #MeraParivarBhajapaParivar campaign from Ahmedabad, Gujarat. https://t.co/q31ZzOmufU
— BJP (@BJP4India) February 12, 2019
प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर पक्षाचा झेडा लावावा. त्यासोबत आपला सेल्फी काढावा आणि तो सोशल मीडियावर शेअर करावा, अशी सूचना यावेळी अमित शहा यांनी देशातील कार्यकर्त्यांना केली. पाच कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकाविण्याचा संकल्प पक्षाने सोडला आहे. त्यासाठी प्रत्येकाने झेंडा लावावा, अशी सूचना अमित शहा यांनी केली आहे. सोशल मीडियामध्ये हा फोटो शेअर करताना #MeraPariwarBhajapaPariwar या हॅशटॅगचा वापर करावा, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.
येत्या २ मार्चपर्यंत देशात चार टप्प्यांमध्ये ही मोहिम होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.