महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते; भाजप नेत्याची मुक्ताफळे

नेत्यांच्या वाचाळपणामुळे भाजपची सातत्याने कोंडी होताना दिसत आहे.

Updated: May 17, 2019, 04:40 PM IST
महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते; भाजप नेत्याची मुक्ताफळे title=

भोपाळ: महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते, असे बेताल वक्तव्य करून भाजप नेते अनिल सौमित्र यांनी शुक्रवारी नव्या वादाला तोंड फोडले. या वक्तव्यानंतर भाजपने अनिल सौमित्र यांच्यावर तात्काळ कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले. तसेच पक्षाने त्यांना सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले आहेत. 

अनिल सौमित्र यांनी शुक्रवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी महात्मा गांधीजींना उद्देशून म्हटले की, ते राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र होऊन गेले. काही लायक होते, तर काही नालायक, असे अनिल सौमित्र यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. यामुळे भाजपला पुन्हा एकदा टीकेला सामोरे जावे लागले होते. 

तत्पूर्वी भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यानेही मोठी खळबळ माजली होती. त्यांनी महात्मा गांधीजी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. या निवडणुकीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते. 

भाजपने त्यांच्या या वक्तव्यापासून तात्काळ फारकत घेत साध्वी प्रज्ञा यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते. पक्षाच्या या इशाऱ्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनीही नमती भूमिका घेत या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना पूर्णपणे कदापि माफ करणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.