नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या जालंधरमध्ये भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे आज उद्घाटन करणार आहेत. या वार्षिक सोहळ्यात देशभरातून आलेले वैज्ञानिक चर्चा करतात. हा संपूर्ण कार्यक्रम 'भविष्यातला भारत- विज्ञान आणि औद्योगिकरण' या विषयावर आधारित असणार आहे. लवली प्रोफेशनल विश्वविद्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 3 ते 7 जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील. तसेच या कार्यक्रमाला भाजपाच्या 'मिशन 2019' ची सुरूवात मानली जाते. लोकसभा निवडणूकीची तारीख समजेपर्यंत पंतप्रधान मोदी 20 राज्यांत एकूण 100 सभा करणार आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या योजनांबद्दल पंतप्रधान या रॅलीतून संबोधित करणार आहेत.
5 दिवस चालणाऱ्या या कॉंग्रेस विज्ञान तसेच उद्योगांशी जोडले गेलेले 100 हून अधिक संम्मेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. डीआरडीओ, इस्रो, विज्ञान आणि औद्योगिक विभाग, एम्स, यूजीसी, एआईसीटीईचे अधिकारी यामध्ये सहभागी होतील. यामध्ये ब्रिटन, अमेरिका आणि भारताच्या प्रमुख विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी होतील. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन तसेच स्मृति ईराणी देखील यामध्ये सहभागी होतील.
विज्ञान आणि उद्योगाचा लाभ समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. 'देशासमोर येणारे प्रश्न आणि आव्हाने पेलण्यासाठी वैज्ञानिकांना आपले मन आणि आत्म्यापासून एक प्रेरणा म्हणून काम करायला हवे. तसेच सर्वसाधारणनागरिकांच्या जीवनात गुणवत्ता आणि सुधार करायला हवा' असेही ते म्हणाले.