नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसद भवनामध्ये येताना एक जॅकेट घातले होते. या जॅकेटवर Namo again! असा संदेश लिहिण्यात आला होता. या जॅकेटची संसदेच्या आवारात चांगलीच चर्चा होती. त्यातच अनुराग ठाकूर यांनी या जॅकेटमधील एक फोटो त्यांच्या ट्विटर हॅंडलवर टाकला. त्यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, बाबूल सुप्रियो, सर्बानंद सोनवाल यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मेन्शनही केले होते. मी हे जॅकेट घातले आहे. आता तुमची वेळ आहे, अशा आशयाचा संदेशही ट्विटमध्ये लिहिण्यात आला होता. त्याचबरोबर हे जॅकेट कुठे मिळेल, याचीही माहिती तिथे होती. त्यांच्या या ट्विटला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे त्यांच्या या ट्विटवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. नमो मर्चंडाईजने या संदर्भात केलेल्या ट्विटला रिट्विट करीत नरेंद्र मोदी यांनी अनुराग ठाकूर यांना मेन्शन करीत छान दिसताहात (Looking Good), अशी प्रतिक्रिया दिली.
I am wearing mine
Where is your hoodie ?@KirenRijiju @Ra_THORe@ManojTiwariMP@SuPriyoBabul@sarbanandsonwal@Dev_Fadnavis@jairamthakurbjp@ChouhanShivraj@drramansingh@vijayrupanibjp@myogiadityanath
Your Turn to Wear It, Tweet & Tag
Buy it here @namomerchandise pic.twitter.com/Kwh5mCjexu
— Anurag Thakur (@ianuragthakur) January 8, 2019
अनुराग ठाकूर यांच्या या ट्विटला इतरही अनेक राजकीय नेत्यांनी लाईक केले. त्याचबरोबर काही जणांनी त्यांच्याकडील जॅकेट घालून काढलेले फोटोही रिट्विट स्वरुपात अपडेट केले. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनीही हे जॅकेट घातलेला फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मेन्शन केले.
Looking good, @ianuragthakur! https://t.co/mT28nAvH8d
— Narendra Modi (@narendramodi) January 8, 2019
लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांनीही गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी जाहिर सभा घेत सरकारने गेल्या साडेचार वर्षांच्या काळात केलेल्या कामाची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच गरीब सवर्णांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. हे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले.