भोपाळ: भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान चक्कर येऊन कोसळल्याचा प्रकार घडला. भोपाळमधील भाजप मुख्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी साध्वी प्रज्ञा भाजप मुख्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांची तब्येत अचानक बिघडली. भोवळ आल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. यानंतर साध्वी प्रज्ञा यांना घरी नेण्यात आले.
'काँग्रेसच्या काळात तुरुंगात झालेल्या छळामुळे मला आता डोळ्यांनी धड दिसतही नाही'
गेल्या काही दिवसांपासून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर उपचार सुरु आहेत. या उपचारांसाठी त्या लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत होत्या. अनलॉक झाल्यानंतर त्या पुन्हा भोपाळमध्ये परतल्या होत्या. मात्र, औषधे सुरु असल्यामुळे त्या सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळत होत्या. परंतु, आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
VIDEO: तुरुंगातील अत्याचारांबद्दल सांगताना साध्वी प्रज्ञांना भर सभेत रडू कोसळले
यापूर्वी रविवारी २१ जून रोजी ‘योगा डे’ निमित्त आयोजित भाजप कार्यालयातील कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होता. यावेळी त्यांनी आपल्या शारीरिक व्याधींसाठी काँग्रेसला जबाबदार धरले होते. काँग्रेसच्या राजवटीत मी नऊ वर्षे तुरुंगात होते. तुरुंगात झालेल्या छळादरम्यान मला अनेक दुखापती झाल्या होत्या. तसेच अनेक जुन्या व्याधीही बळावल्या. या सगळ्यामुळे माझ्या डोळ्यांचा रेटिना आणि मेंदूत सूज आणि पू तयार झाला. त्यामुळे मला उजव्या डोळ्याने भुरकट दिसते. तर डाव्या डोळ्याने मला काहीच दिसत नाही. हे सगळे काँग्रेसच्या काळातील छळामुळे झाल्याचा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला होता.