'मोदी रोको' हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा- प्रकाश जावडेकर

पंतप्रधानांनी देशातील जनतेला नव्या भारताचे स्वप्न दाखवले आहे.

Updated: Sep 9, 2018, 03:46 PM IST
'मोदी रोको' हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा- प्रकाश जावडेकर title=

नवी दिल्ली: आगामी निवडणुकीसाठी विरोधकांकडे कोणताही अजेंडा किंवा धोरण नाही. केवळ 'मोदी रोको अभियान' हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ते रविवारी दिल्लीत सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जावडेकरांनी २०१९ मध्ये भाजप मोठ्या बहुमतासह सत्तेवर येईल, असा दावाही केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हा विलक्षण असा मेळ आहे. सध्याच्या घडीला देशातील १९ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पंतप्रधानांनी देशातील जनतेला नव्या भारताचे स्वप्न दाखवले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये देशाने विकास केला आहे. गरिबी, दहशतवाद आणि भ्रष्टाचाराच्या समस्येपासून २०२२ पर्यंत भारताला मुक्ती मिळेल, असेही जावडेकर यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. यावेळी ते आगामी निवडणुकीच्यादृष्टीने कार्य़कर्त्यांना कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.